विधानभवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करणारे आमदार क्षितिज ठाकूर यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सुमारे तासभर चालली. भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. 
विधानभवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीचा राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. कोणत्याही स्थितीत पोलिसांवर हात उचलायचा नाही, असे त्यांनी अमरावती येथील जाहीर सभेत सांगितले. सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱया आमदारांमध्ये मनसेचे आमदार राम कदम यांचाही समावेश होता. याप्रकरणी ठाकूर आणि कदम या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.