Maharashtra Assembly Monsoon Session 2022 : आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावरून आता आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, आमदार महेश शिंदे यांनी अमोल मिटकरींशी झालेल्या धक्काबुक्कीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. “अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा दाग आहेत. त्यांच्यावर पक्षातील वरिष्ठांनी कारवाई करायला हवी”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Session: “अरे हाड! ते काय…,” विरोधकांनी धक्काबुक्की केली का? विचारताच भरत गोगावले संतापले

नेमकं काय म्हणाले महेश शिंदे?

“अमोल मिटकरींबाबत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा दाग अशी त्यांची ओळख आहे. आज त्यांचं वागणं संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. सीसीटीव्हीतही ते कैद झालं आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करत असताना अमोल मिटकरींनी आम्हाला ढकललं म्हणून धक्काबुक्की सुरू झाली. अमोल मिटकरी हे लोकशाही विचारांचे नेते नाहीत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई करावी”, अशी प्रतिक्रिया महेश शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “एक नाही दहा नाही, हजार वेळा माफी मागणार, पण…,” विधीमंडळ पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरी आक्रमक

शिंदेंनी सांगितला सविस्तर प्रसंग?

“अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधीपक्षातील आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून विविध घोषणा देत आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत होते. आज आम्ही सर्व आमदारांनी एकत्र येत आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेत आंदोलन करत होतो. यावेळी काही सदस्य पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच अर्वाच्च भाषेत बोलण्यात आले. विधीमंडळ परिसरातले त्यांचे वर्तन निंदनीय आणि अशोभनिय होते”, असे ते म्हाणाले.

हेही वाचा – राज ठाकरे भाजपाची तळी उचतात म्हणणाऱ्या अंबादास दानवेंना मनसेचं प्रत्युत्तर; म्हणाले, “औरंगजेबाची औलाद असलेल्या…”

“विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार”

“आम्ही सर्व आमदारांनी एकत्र येऊन निर्णय केला आहे. विधीमंडळ परिसरात ज्यांनी लोकशाहीला लाजवेल असे कृत्य केले त्यांच्या विरोधात आम्ही अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.