‘भाजपमध्ये महिलांना डावलले जाते’

मुंबई : भाजपमध्ये महिलांचा योग्य सन्मान राखला जात नाही व त्यांना डावलले जाते, अशी खदखद नवी मुंबईतील बेलापूर येथील आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतीच व्यक्त केली. त्याची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबईतील राजकारणात माजी मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील संघर्ष जुना आहे. भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी वाशी येथे आयोजित

के लेल्या लसीकरणाच्या कार्यक्र माचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी ऐरोलीतील आमदार गणेश नाईक यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांना डावलण्यात आले होते. जाहिरात फलकावर त्यांचे छायाचित्रही नव्हते. त्यामुळे चिडलेल्या मंदा म्हात्रे यांनी भाषणात पक्षावर तोंडसुख घेतले. दोन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

पक्षाने २०१९ ला उमेदवारी दिली नसती, तर मी अपक्ष लढणार होते. तसे मी वरिष्ठांना सांगितले होते. मी कुणालाही घाबरत नाही. पहिल्यांदा २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून आल्याचा आरोप माझ्यावर केला गेला. पण २०१९ ला मोदी लाट नसताना मी स्वत:च्या कामामुळे प्रचंड मतांनी  निवडून आले असल्याचा दावा मंदा म्हात्रे यांनी केला.

मला आजही संघर्ष करावा लागत आहे. एखादी स्त्री चांगले काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. त्यांची छायाचित्रे फलकावर वापरायची नाहीत, कार्यक्रमाला आमंत्रित करायचे नाहीत, असे प्रकार भीतीमुळे सुरू होतात. पण न घाबरता आपण आपले काम सुरू ठेवायचे, असे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. मला उमेदवारी दिली किंवा नाही, तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रेंशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे सांगितले. पक्षात आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतात. मंदा म्हात्रे यांना काही अनुभव आले असतील तर त्यांच्याशी बोलू. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचा उत्तम संवाद आहे, असे पाटील यांनी नमूद केले.