मुंबई : गायमुख ते शिवाजी चौक, मेट्रो १० आणि कासारवडवली, ठाणे ते वडाळा मेट्रो ४ या दोन मार्गिकांना जोडणाऱ्या कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ ए, मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. या मार्गिकेमुळे संपूर्ण घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होईल.
एमएमआरडीए कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३४२ कोटी रुपयांच्या या कंत्राटाचा निर्णय घेण्यात आला. कासारवडवली ते गोविनवाडा आणि गोविनवाडा ते गायमुख दरम्यानचे स्थापत्य काम आणि गोविनवाडा व गायमुख या दोन स्थानकांची स्थापत्य कामाच्या निविदांना मंजुरी देतााना मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आली.
‘कासारवडवली ते गायमुख हा २.७ किमी लांबीचा मेट्रो मार्ग वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ चा विस्तारित मार्ग आहे. रहिवाशांच्या मागणीला मान देऊन हा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. या मार्गावरून भविष्यात १.३ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.’ असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.