मराठी चित्रपट ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत, मात्र बॉलिवूड चित्रपट ‘हाऊसफुल ४’ मुळे दोन्ही मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही आहेत. दरम्यान मनसेने साहेबांच्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला जास्त पटेल असं सांगत चित्रपटगृह मालकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंबंधी चित्रपटगृह मालकांना पत्र लिहिलं आहे. याआधी त्यांनी हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा इशारा दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबरला तर ‘ट्रिपल सीट’ २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामुळे मराठी चित्रपटांची कोंडी होताना दिसत आहे. मनसेने या मुद्द्यावरुन थिएटर मालकांना इशारा देत तुटेल इतकं ताणू नका असं म्हटलं आहे.

अमेय खोपकर यांनी चित्रपटगृह मालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “हिरकणी आणि ट्रिपल सीट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांचा अथक प्रयत्न चालू आहे. पण चित्रपटगृह उपलब्ध नाही असे ठोकळेबाज उत्तर प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? ही अशी मोनोपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे?”.

“येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जे हवे ते करु…मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही जे हवे ते करु. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत याचा असा गैरसमज तुम्ही करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे,” असंही अमेय खोपकर यांनी पत्रात लिहिलं आहे.

यावेळी त्यांनी कदाचित साहेबांच्या भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल असा इशारा दिला. “स्वत: जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या खास भाषेत तुम्हाला समजवावं लागेल. तेव्हा तुटेल तेवढे ताणू नका,” असं अमेर खोपकर यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns amey khopkar marathi films hirkani triple seat housefull 4 sgy
First published on: 23-10-2019 at 16:25 IST