घराच्या दुरूस्तीकामात अडथळा निर्माण करून २० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या ‘मनसे’च्या नगरसेवकाला मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या पथकाने शनिवारी अटक केली. सुरेश आवळे असे या नगरसेवकाचे नाव असून त्याच्या दोन सहकाऱ्यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. घराच्या दुरूस्तीच्या कामाला विरोध करीत पैशांची मागणी आवळे करत असल्याची तक्रार एका महिलेने केली होती.
घाटकोपर येथील रमाबाई नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पावसाळ्यात घरात पाणी शिरत असल्याने पावसाळ्यापूर्वीच्या उपाय योजना म्हणून घराच्या दुरूस्तीचे काम सुरू केले होते. त्याचा ठेकाही एका खाजगी ठेकेदाराला दिला होता.
२० हजार रूपये दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असे नगरसेवकाकडून ठेकेदारास धमकावण्यात आले. त्यामुळे या महिलेने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रूचून विलास मारूती तुपे आणि आशुतोष मनोहर केदार या दोघांना १२ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तर नगरसेवक सुरेश आवळे याला त्याच्या घाटकोपरमधील कार्यालयातून अटक करण्यात आली.