दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आरे कारशेडच्या जागेच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पर्यायी जागेचा तोडगा जाहीर केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ची आरेतील कारशेड रद्द करून ती जागा राखीव वन जाहीर करतानाच मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला उभारणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून अहंकारातून हा निर्णय घेतल्याचा आरोप करत फडणवीस यांनी आर्थिक नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या अन्य काही नेत्यांनाही या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र आर्थिक नुकसानीच्या याच मुद्द्यावरुन आरेतील मेट्रो शेड दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेणाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी खोचक शब्दात समाचार घेतला आहे. अमित यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. अमित ठाकरेंची या विषयासंदर्भातील भूमिका मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात शेकडो झाडांची कत्तल अतिशय विनम्रतेने केलेली”

मनसेच्या अकाऊंटवरुन अमित ठाकरेंची भूमिका मांडणारा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटो पोस्टमध्ये सुरुवातील, ‘मेट्रो कारशेड आरेमधून हटवल्यास आर्थिक नुकसान होईल असे आरोप होत आहेत. अमित ठाकरेंना काय वाटते?’, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याखाली अमित ठाकरेंची भूमिका मांडताना, “मुंबईचं आणि भवी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडलं,” असं मत व्यक्त केलं आहे. या पोस्टबरोबर आरेचा मुंबईचं फुफ्फुस असा अल्लेख करणारा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

फडणवीस म्हणाले नुकसान होणार

कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची आठवण फडणवीस यांनी सरकारला करुन दिली आहे. “मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेल्यास ४००० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुविधेला खीळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते?,” असं फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्टद्वारे फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. या संदर्भात फडणवीस यांनी सरकारपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असं त्यांनी म्हटलं आहे. “कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला पण त्यावर हायकोर्टाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली त्यावर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २,४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? असा सवाल विचारताना हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय कांजूरमार्गची जागा मर्सी लँड असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षांचा अवधी लागेल. याशिवाय आत्तापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेला नाही”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amit thackeray slams those who oppose the decision of thackeray government of shifting aarey metro car shed scsg
First published on: 12-10-2020 at 18:08 IST