संपूर्ण जग सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवण्यात आला आहे. सध्याच्या खडतर काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वंदे भारत’ ही योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक देशांत अडकलेले भारतीय लोकं स्वगृही परतत आहेत. मात्र संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेली अनेक मराठी कुटुंब अद्याप महाराष्ट्रात परतण्याच्या आशेवर आहेत.

संयुक्त अरब अमिरातीत सध्या १ हजारपेक्षा जास्त मराठी कुटुंब असून त्यांच्यात ज्येष्ठ नागरिक आणि काही गर्भवती महिलांचा समावेश आहे. लॉकडाउन काळात रोजगार तुटल्यामुळे या परिवारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे. या कुटुंबांसाठी अद्याप वंदे भारत योजनेतून कोणतीही सुविधा आयोजित केल्याचं दिसत नाही. या कुटुंबांना महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा असं आवाहन, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे.

आणखी वाचा- ‘त्या’ गोष्टीवर आदित्य ठाकरेंचा फोटो छापल्याने युवासेनेला मनसे टोला; म्हणाले…

देशातील इतर राज्यांचे नागरिक आपल्या घरी परतत असताना, महाराष्ट्रातील नागरिकांना घरी आणण्यासाठी विमानाची सोय का होत नाही या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं असल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र सरकारने परराष्ट्र मंत्रालय, हवाई उड्डाण मंत्रालयावर दबाव आणून या मराठी कुटुंबांना मायदेशी आणण्याची सोय करावी असं आवाहन सरदेसाई यांनी केलं आहे.