सध्या देशातील करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक राजकीय पक्षही नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहे. पण काही ठिकाणी या मदत साहित्यावर जाहिरातबाजी होत असल्याचं चित्र सध्या समोर आलं आहे. यावरून आता मनसेनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मदत साहित्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कुलाबा परिसरात सॅनिटरी नॅपकीनचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिवसेनेद्वारे ५०० सॅनिटरी नॅपकीनचं वाटप झालं. परंतु या मदत साहित्यामधील सॅनिटरी नॅपकीनच्या पाकिटांवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना फोटो छापण्यात आला होता. युवती आणि युवा सेनेकडून गरजूंसाठी या सॅनिटरी नॅपकीनचं वाटप करण्यात आलं होतं. दरम्यान, याचे फोटो काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसंच मदत साहित्यावरही फोटो छापण्यात आल्यानं त्यावर टीकाही करण्यात आली होती. यावर आता मनसेनंही टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- अरब देशातील मराठी कुटुंबांना आणा – मुख्यमंत्र्यांकडे मनसेची मागणी

“हे फोटोदेखील आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईत करोनाचा कहर जास्त आहे. याव्यतिरिक्त कंटेन्मेंन्ट झोनची संख्याही अधिक आहे. अशा परिस्थितीत घरातील कोणालाही बाहेर जाणं शक्य नसल्यानं अनेकांकडून त्यांना मदत करण्यात येत आहे.