कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंधेरी मेट्रो-३ प्रकल्प संपूर्ण शहराचा विचार करून आखण्यात आला असून विविध प्रकारच्या सर्वेक्षणाअंती मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मेट्रो-३’च्या मार्गात बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने घेतली आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मेट्रो-३चे काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका घेत मनसेने  मेट्रो-३च्या विरोधात आंदोलन पुकारले.
मनसने ठाकूरद्वार नाक्यावर केलेल्या आंदोलनात मेट्रोची प्रतीकात्मक गाडीची होळी करण्यात आली. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाकूरद्वार परिसरातील रहिवाशांनी ‘मेट्रो-३’लाच विरोध दर्शविला. गिरगावकरांना पश्चिम आणि मध्य रेल्वे जवळ आहे. त्याशिवाय बेस्टची बसही उपलब्ध आहेत. त्यामुळे या परिसरात ‘मेट्रो-३’ची गरज नाही. भेंडीबाजर परिसरातील रहिवाशांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळे तो भेंडीबाजारात राबवावा अन्यथा कमी लोकवस्तीच्या महर्षी कर्वे मार्गाचा विचार करावा, अशी सूचना काही रहिवाशांनी या वेळी केली. ‘मेट्रो-३’ याच मार्गावरून न्यायची असल्यास आमचे पुनर्वसन गिरगावातच करावे लागेल, कोणत्याही परिस्थितीत म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जाणार नाही, असेही रहिवाशांनी एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांना  सांगितले.  मेट्रोला आमचा विरोध नसून तेथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी आमची भूमिका असल्याचे मनसेचे अरविंद गावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणी चर्चा करण्यासाठी पुढील आठवडय़ात एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची भेट घेणार असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns opposed to metro 3 project
First published on: 07-03-2015 at 01:16 IST