मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर मंगळवारी सकाळी राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांची दुर्मिळ छायाचित्रे शेअर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘कमळा’ला स्वबळावर उमलू न देण्यासाठी बंधुराजांची चाचपणी तर सुरू झाली नाही ना?, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, मनसेकडून राज आणि उद्धव यांची दुर्मिळ छायाचित्रे शेअर करताना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटला मेन्शन करण्यात आले आहे. त्यामुळे ही छायाचित्रे अशी अचानक शेअर करण्यामागचे ‘राज’ काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘मनसे अधिकृत’ हे राज ठाकरे यांच्या पक्षाचे अधिकृत ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट असून, या माध्यमातून पक्षाशी संबंधित प्रत्येक अपडेट्स, एखाद्या विषयावरील पक्षाची भूमिका, पक्षाचे विविध उपक्रम यांची माहिती त्यावरून शेअर करण्यात येते. यापूर्वीही जवळपास प्रत्येक निवडणुकीवेळी राज-उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चेने जोर धरला आहे. एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटीचेही प्रयत्न झाले. पण दोन्ही पक्षांच्या मनोमिलनास आजवर यश आलेले नाही. मग, आता उद्धव यांच्यासोबतची दुर्मिळ छायाचित्रे शेअर करण्यामागचा प्रपंच काय? यावर राज ठाकरे काय सांगतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

 

(छायाचित्र साभार- मनसे ट्विटर अकाऊंट)