मुंबई : राज्यपालनियुक्त १२ जागांसाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्यावर या नियुक्त्या मार्गी लागाव्यात, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडीच्या वेळीही पंतप्रधान मोदी यांची मध्यस्थी कामी आली होती.

सहा महिन्यांच्या मुदतीत विधिमंडळाचे सदस्य होता यावे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस दोनदा राज्य मंत्रिमंडळाने केली होती. पंरतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याच्या कारणावरून ठाकरे यांची नियुक्ती करण्यास नकार दिला होता. सहा महिन्यांची मुदत संपत आल्याने ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधला होता.  पंतप्रधान मोदी यांनी मध्यस्थी केल्यावर विधान परिषदेच्या आठ जागांची निवडणूक जाहीर झाली आणि ठाकरे यांची विधान परिषदेवर सहा महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी निवड झाली.