एके काळी काळाच्या पुढे असणारे प्रवासात एका जागी थांबले की कसे मागे पडतात आणि इतरांनाही कसे मागे ओढतात याचे ‘मूर्ती’मंत उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती. इन्फोसिस या त्यांनी स्थापित केलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी मूर्ती यांच्या निवृत्त्योत्तर लुडबुडीस कंटाळून अखेर राजीनामा दिला. कंपनीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत, यासाठी प्रयत्नशील असतानाच सिक्का यांना जाणे भाग पाडल्याने होणारे नुकसान एकटय़ा इन्फोसिसचे नाही. ते भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आहे. पिढीच्या संघर्षांत पुढच्याऐवजी मागच्या पिढीचीच सरशी होत असेल तर ते या क्षेत्राला मागे नेणारे आहे. सिक्का यांच्या जाण्यामुळे इन्फोसिसचीच कोंडी होणार असून तिला ना कोणी प्रयोगशील प्रमुख भेटेल ना आता कंपनी बदलण्याचा प्रयत्न होईल. हे दुर्दैवी आहे. याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर प्रत्येक क्षेत्रातील दुढ्ढाचार्याचे वारंवार मूर्तिभंजन व्हायला हवे. मूर्तिपूजेतून स्थितीवादीच तयार होतात. प्रगतीसाठी मूर्तिभंजनास पर्याय नाही, असे मत ‘‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत अबेदा इनामदार महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थीनी मोनाली अवसरमल ही ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत पुणे येथील भावे बॉइज हायस्कूलचा विद्यार्थी विहंग लावंड याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या मोनाली आणि विहंग यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. मोनालीला सात हजार आणि प्रमाणपत्र तर विहंगला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.