भांडुपमध्ये घार तर अनेक ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवदान

मुंबई : गेले काही दिवस मुंबई आणि परिसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरात अडकलेल्या नागरिकांना अनेकदा मदत केली जाते; मात्र प्राणी-पक्षी दुर्लक्षित राहतात. काही दिवसांपासून वन्यजीव रक्षकांनी २५ हून अधिक वन्यजीवांची मानवी वस्त्यांमधून सुखरूप सुटका केली आहे.

सुटका करण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये अजगर, घोणस, मांजऱ्या सर्प, नाग, धामण, झिलान, तस्कर, इत्यादी सरपटणाऱ्या प्राण्यांसह, २ घोरपडी आणि ३ घारी यांचाही समावेश आहे. बोरिवली येथे अचानक पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाल्यामुळे एक गृहिणी घराबाहेर आली असता तिला घोणस साप दिसला. तिने त्वरित वन्यजीव रक्षकांना बोलावले व त्यामुळे सापाचा जीव वाचला. अशाच प्रकारे पुराच्या पाण्यासोबत वाहत येऊन घरापर्यंत पोहोचलेल्या अजगराचीही सुटका करण्यात आली.

‘साप बऱ्याचदा बिळात किंवा अडचणीच्या ठिकाणी खाचखळग्यात राहतात. सध्या पावसाचे पाणी या जागांमध्ये शिरल्याने त्यांना बाहेर यावे लागले आहे. इमारतीच्या आवारात, उद्वाहनाजवळ इत्यादी ठिकाणी साप दिसत आहेत’, अशी माहिती वन विभागाचे मानद वन्यजीवरक्षक सुनीष सुब्रमण्यम यांनी दिली. भांडुप येथे एक घारही सापडली होती. भिजलेल्या अवस्थेत असलेल्या या घारीला आधी कोरडे करण्यात आले. कोणताही प्राणी, पक्षी पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी के ली जाते. कोणतीही आरोग्यविषयक समस्या नसल्याची खात्री पटल्यावरच त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते.

‘असे प्राणी कोठेही आढळल्यास त्यांना मारू नये व वन्यजीव रक्षकांना कळवावे’, असे आवाहन सुनीष यांनी के ले आहे.