मुंबईतील करोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील ७७ टक्के रुग्ण

१९ जूनपर्यंत ३ हजार ४२३ करोनामृत्यूंची नोंद

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील करोना मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून यात ५० वर्षांवरील रुग्णांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. १९ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृतांपैकी ७७ टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील होते.

मुंबईतील करोना रुग्णसंख्येच्या वाढीचा दर कमी झालेला असला तरी गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडा वाढलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चपासूनच्या विविध मृत्यू प्रकरणांची पडताळणी करून त्यांची संख्या मृतांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आली आहे. विविध रुग्णालयांतून मार्चपासून झालेल्या ८६२ मृत्यंची संख्या एकूण मृतांच्या आकडय़ात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच मृतांची आकडेवारी एखाद्या रुग्णालयाकडे प्रलंबित असल्यास त्याची माहिती ताबडतोब देण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यामुळे गेल्या काही दिवसांत मृत्यूंची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. मृत्यूचा दर ५.२ च्या पुढे गेला आहे. १९ जूनपर्यंत ३ हजार ४२३ करोनामृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी २ हजार ६५१ मृतांचे वय ५० पेक्षा जास्त आहे.

५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कोविडचे काम नको

पालिकेचे आतापर्यंत सुमारे दोन हजार कर्मचारी बाधित झाले असून ७० जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने मात्र ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनाच सूट दिली आहे. मात्र मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामामध्ये राज्य आणि केंद्र सरकारप्रमाणे ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी पालिका इंजिनीअर असोसिएशनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. तसेच ज्या कामगारांना काही दीर्घकालीन आजार असतील त्यांची रजा मंजूर करावी, अशीही मागणी राजाध्यक्ष यांनी केली आहे.

पालिकेच्या अभियंत्याचे निधन

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांचे करोनामुळे सेव्हन हिल्स रुग्णालयात रविवारी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. मंगळवापर्यंत ते कामावर हजर होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

वय    मृत्यू

३० ते ४० वर्षे – १६२

४० ते ५० वर्षे – ४५६

५० ते ६० वर्षे – ९६३

६० ते ७० वर्षे –  ९६४

७० ते ८० वर्षे – ५१२

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: More than 50 year olds die in corona in mumbai abn