क्षणभराच्या रागामुळे स्वतःची आईच एका चिमुरड्यासाठी वैरीण ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीशी झालेल्या कुरबुरीवरुन चिडलेल्या एका महिलेने आपल्या चिमुकल्याला विष पाजले आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सांताक्रूझमधील शिवाजीनगर भागात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, घरातील आर्थिक चणचणीवरून पती राजेश आयरेशी झालेल्या भांडणामुळे रागात असलेली पत्नी रीना आयरे (वय ३४) या महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याला कीटकनाशक पाजले. तसेच स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी रीना आयरे हिच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रीनाच्या प्रकृतीत सुधार होताच तिला अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी दिली.

सांताक्रूझ-जुहू-तारा रोडवरील शिवाजीनगर परिसरात पती-पत्नी, मुलासह राहणाऱ्या राजेश आयरे हा मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याला आर्थिकदृष्ट्या चणचण जाणवत होती. घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पत्नी रीनाने राजेशकडे घर खर्चासाठी पैसे मागितले. त्यावरून पती-पत्नीत भांडणे झाली. या भांडणाचा राग मनात धरून रीना रागाने घरातून पाच वर्षीय हर्ष या मुलाला घेऊन घराबाहेर पडली त्यानंतर ती मुलाला घेऊन जुहू चौपाटी येथे आली. तिने मेडिकल दुकानातून उंदीर मारण्याचे विष खरेदी केले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिने ते स्वतः प्राशन केले. दरम्यान आपल्या मागे मुलाचे काय होईल असा विचार करीत तिने ते विष पाच वर्षाच्या हर्षलाही पाजले.

दरम्यान, काही वेळात राग शांत झाल्यानंतर पश्चाताप झाल्याने तीने त्वरीत कुपर रुग्णालय गाठले. घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती मिळताच पती राजेश हा रुग्णालयात धडकला. रुग्णालयातून सांताक्रूझ पोलिसांना कळविले. पोलिसांनी रीनाचा जबाब नोंदवला. तर मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या दोन मिनिटांच्या रागाने संपूर्ण आयुष्याची राख करून टाकल्याचा पश्चाताप रुग्णालयात पडलेल्या रीनाला आता सतावत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother being murderer for her child two minutes make ambush
First published on: 14-11-2018 at 23:35 IST