scorecardresearch

‘अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडे असणे गरजेचे’

छोटय़ा पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीला तिच्या पाच वर्षांच्या मुलाला विभक्त पतीकडे सोपवण्याचे आदेश देण्यास नकार दिला.

‘अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडे असणे गरजेचे’

मुंबई : अल्पवयीन मुले आईच्या सहवासात असणे अधिक स्वाभाविक आणि मुलांच्या कल्याण व विकासासाठी अनुकूल असल्याचे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. तसेच छोटय़ा पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीला तिच्या पाच वर्षांच्या मुलाला विभक्त पतीकडे सोपवण्याचे आदेश देण्यास नकार दिला.

श्वेताचा विभक्त पती अभिनव कोहली याने हेबियस कॉर्पस याचिका दाखल करत त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला न्यायालयात हजर करण्याचे आणि त्याला ताब्यात देण्याचे आदेश श्वेताला देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने कोहली याची याचिका फेटाळली.

मुलगा श्वेतासोबत राहिला तर त्याच्या कल्याण व विकासासाठी ते हानिकारक असल्याचा सकृद्दर्शनी कुठलाही पुरावा नाही. या वयात मुलांना आईच्या सहवासाची अधिक गरज असते. किंबहुना प्रेम, आपुलकी, काळजी आणि संरक्षण आई कोवळय़ा वयातील मुलांना देऊ शकते, ते वडील वा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून दिली जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले. तसेच श्वेता कामात खूप व्यग्र असते. त्यामुळे ती मुलाचे योग्य प्रकारे संगोपन करू शकत नसल्याचा याचिकाकर्त्यांने केलेला दावाही न्यायालयाने अमान्य केला.

‘मुलांना आई, वडील दोघांचे प्रेम मिळावे’

मुलांना आई आणि वडील दोघांचे प्रेम व आपुलकीची आवश्यकता असते. त्यामुळे मुलाला दररोज याचिकाकर्त्यांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून अर्धा तास संवाद साधू देण्याचे तसेच आठवडय़ातून दोन वेळा त्यांना भेटू देण्याचे आदेश न्यायालयाने श्वेताला दिले. तसेच याचिकाकर्ता आणि प्रतिवादी दोघेही व्यवसायाने कलाकार असून ते पडद्यावर चांगल्या भूमिका साकारतात. खऱ्या आयुष्यातही ते मुलाच्या हितासाठी अशीच भूमिका बजावतील, असेही न्यायालयाने म्हटले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother needs to have custody of the minor child bombay hc zws

ताज्या बातम्या