scorecardresearch

‘आरे वाचवा’साठी पदयात्रा

पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.

‘आरे वाचवा’साठी पदयात्रा
आरे संवर्धन गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तावित कारशेडच्या निषेधार्थ रविवारी पदयात्रा काढली. (छायाचित्र : निर्मल हरिंद्रन ) 

‘मुंबई मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे वसाहत येथील प्रस्तावित कारशेडच्या निषेधार्थ रविवारी आरे संवर्धन गटाच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर, त्यानंतर दादर येथील गुरुद्वारा, हाजी अली आणि अंधेरीमधील होली फॅमिली चर्च असा पदयात्रेचा मार्ग होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आरे वाचविण्यासंबंधीचा आपला शब्द पाळावा अशा अर्थाचे फलक पदयात्रेत दिसत होते.

कुलाबा-सीप्झ या ‘मुंबई मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे येथील प्रस्तावित कारशेडला सुरुवातीपासूनच पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. आरे संवर्धन गटाच्या कार्यकर्त्यांकडून ‘आरे वाचवा’ मोहिमेसाठी रविवारी सकाळी पदयात्रा काढण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्कपासून सुरू झालेली पदयात्रा पुढे सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, दादरमधील गुरुद्वारा आणि अंधेरीतील होली फॅमिली चर्च येथे गेली. या वेळेस पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात एक रोपटे देण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी या सर्व प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन रोपटय़ाची पूजा केली. येत्या २१ मे रोजी ही रोपटी आरेमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती आरे संवर्धन गटाचे कार्यकर्ते स्टेलिन दयानंद यांनी दिली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी ‘आरेच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री वचनबद्ध आहेत, आता आपल्या शब्दांचे काय झाले?’ असे फलक घेतले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मुंबईतील हरित पट्टा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले होते. मात्र आता मुख्यमंत्री महोदय स्वत:च दिलेला शब्द पाळत नसल्याने अशा अर्थाच्या फलकांचा वापर आम्ही केला असल्याचे स्टेलिन यांनी सांगितले. मुंबईतील डब्बेवाला असोसिएशननेदेखील या पदयात्रेला समर्थन दिले. ‘आरे वाचवा’चा संदेश लिहिलेले पत्र डब्यामधून देण्याचा विचार असल्याचे पदयात्रेत सहभागी झालेले असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी सांगितले.

 

 

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-05-2017 at 02:22 IST

संबंधित बातम्या