सासऱ्याच्या चित्रपटात काम मिळावे यासाठी पत्नीकडे तगादा लावणाऱ्या पण त्याला प्रतिसाद न दिल्याने तिचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिच्या ५६ लाख  रुपये किमतीच्या स्त्रीधनाचा अपहार करणाऱ्या पती, सासू आणि सासरा अशा तिघांविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

तक्रारदार विवाहिताचे वडील निर्माता आणि दिग्दर्शक असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. विवाहितेची चुलती त्याच परिसरात राहत असल्याने पती मोहम्मद वसीम नसीम शेख, सासरा नसीम अहमद शेख आसनी सासू गुलणार यांचे विवाहितेच्या चुलतीकडे येणे जाणे होते. तर वसीम हा चित्रपट नगरीत स्टंटमन म्हणून काम करीत होता. याच ओळखीतून तक्रारदार तरुणीचा विवाह वसीम याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी झाला होता. वसीम याला चित्रपटात अभिनेता बनण्याची हौस होती. तर सासरा नसीम शेख यांना चांगल्या चित्रपटात फाईट मास्टर म्हणून संधी हवी होती.

विवाहितेचे वडील हे चित्रपट निर्माते असल्याने ही संधी उपलब्ध करून द्यावी असा तगादा पती आणि सासऱ्यांनी विवाहितेच्या मागे लावला. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने पती वसीम, सासू गुलनार आणि सासरा नसीम यांनी विवाहितेचा छळ सुरु केला. त्यांच्या छळाला बळी न पडता विवाहितेने निर्माते दिग्दर्शक असलेल्या वडिलांना याबाबत काहीच सांगितले नाही किंवा पतीची आणि सासऱ्याची शिफारसही केली नाही. याचाच राग मनात धरून वारंवार तक्रारदार विवाहिता आणि पती वसीम यांच्यात खटके उडू लागले. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरु झाला. तक्रारदाराच्या लग्नात सुमारे ४० लाख रुपयांचे दागिने, १२ लाखाचे कपडे आणि इतर वस्तू आणि ५२ हजाराची रोकड या तिघांनी विवाहितेकडून काढून घेतले. माहेरहून नव्या व्यवसायासाठी पैसे आणण्याची धमकी देण्यात येऊ लागली. अखेर तिच्या वडिलांनी व्यवसायासाठी वसीम याला पाच लाख रुपये दिले. मात्र, पती, सासू, आणि सासरा यांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. अजून पैशांची मागणी करून तिचा छळ सुरूच ठेवला. किरकोळ गोष्टींवरून विवाहितेला मारहाण करण्यापर्यंत प्रकार गेला. सासरा वसीम हा मद्यप्राशन करून ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता. कालांतराने तो ड्रग्ज व्यावसायिक झाला. त्याच्याविरोधात केसही दाखल झाली. त्यातून सोडविण्यासाठी विवाहितेला आठ लाख रुपये माहेरहून आणण्यास भाग पाडले. अखेर विवाहितेने छळाचा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.

विवाहितेला माहेरी नेण्यात आले. तेव्हा दोन्ही कुटुंबाच्या बैठकीत वसीम याने विवाहितेचा शारिरिक आणि मानसिक छळ करणार नाही, अंमलीपदार्थाचं सेवन करणार नाही अशी हमी दिली. मात्र वसीमच्या आचरणात काहीच बदल झाला नाही. अखेर विवाहितेने माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. तिने पतीकडे असलेल्या ५६ लाखांच्या स्त्रीधनाची मागणी केली. ते परत न दिल्याने तिने ओशिवरा पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. ओशिवरा पोलिसांनी पती वसीम, सासू गुलनार आणि सासरा नसीम या तिघांवर पैशासाठी विवाहितेचा छळ, मारहाण, शारिरिक आणि मानसिक छळ, ठार मारण्याची धमकी स्त्रीधनाचा अपहार अशा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. या प्रकरणाची चौकशी सुरु असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.