महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेदरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रचंड गोंधळ आणि परिणामी परीक्षा पुढे ढकलली जाण्यास ‘वास्ट इंडिया’ ही कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करीत आयोगाने तिच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे. एमपीएससीची ७ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी व आयोगाची प्रतिमा मलीन करण्यासाठीच कंपनीने संकेतस्थळाला व्हायरसची बाधा झाल्याची खोटी ओरड केल्याचा आयोगाचा आरोप आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार ७ एप्रिलला एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेच्या दोन आठवडे आधी एमपीएससीच्या संकेतस्थळाला व्हायरसची बाधा झाल्याने परीक्षा रद्द करून १८ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. प्रत्यक्षात ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती हाताळणाऱ्या वास्ट इंडिया या कंपनीचा गलथनापणा या प्रकारला जबाबदार होता.
परीक्षेच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेऊन त्यांची माहिती एकत्रित करणे आणि त्यांना परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे ही या कंपनीची जबाबदारी होती. पण, आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेणे उमेदवारांना शक्य होत नव्हते. आयोगाने या संदर्भात व्हास्ट इंडियाकडे चौकशी केली असता कंपनीने आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी व्हायरसची आवई उठविली होती. प्रत्यक्षात कंपनीच्या सव्‍‌र्हरला तांत्रिक बाधा झाल्याने त्यावर असलेली ३ लाख २२ हजार उमेदवारांची नष्ट झाली होती आणि ही चूक मानवी होती. परीक्षेच्या तोंडावर हा घोळ निस्तरता येणे शक्य नसल्याने आयोगाला राज्यभरात तब्बल ९३५ केंद्रांवर होणारी परीक्षा रद्द करावी लागली.
या संदर्भात आयोगाने उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली असता हा सगळा गोंधळ पुढे आला. केवळ याच नव्हे तर आधीच्या तीन वर्षांत झालेल्या परीक्षांची माहितीही या कंपनीने गहाळ केली आहे. पण, कंपनीने या संदर्भात आयोगाला अंधारात ठेवले. एमपीएससीने या संदर्भात वास्ट इंडियासोबत केलेला करार रद्द केलाच आहे. शिवाय हा सर्व प्रकार परीक्षा पुढे ढकलण्यासाठी जाणीवपूर्वक केल्याचा ठपका ठेवत पोलिसातही कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.