मुंबई : आयआयटी, एनआयटीसह विविध केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) साखळीतील अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून देशभरातील ४१ हजार ८६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दिल्लीतील मृदुल अग्रवाल याने या परीक्षेत प्रथम स्थान पटकावले आहे.

राष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई परीक्षा घेण्यात येते. मुख्य परीक्षेतून अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जातात. त्यानंतर अ‍ॅडव्हान्समध्ये गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा अ‍ॅडव्हान्स परीक्षेत मृदुल अग्रवाल याने ३६० पैकी ३४८ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये दिल्लीचीच काव्या चोप्रा ३६० पैकी २८६ गुण मिळवून पहिली आली असून देशपातळीवरील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिचे ९८ वे स्थान आहे. राज्यात कार्तिक नायरने देशात सातवे स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबईच्या क्षेत्रात नमन सोनी हा प्रथम आला असून देशपातळीवरील गुणवत्ता यादीत त्याचे सहावे स्थान आहे.

यंदा एकूण एक लाख ४१ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामधून निवड झालेल्या ४१ हजार ८६२ परीक्षार्थीपैकी ६,४५२ मुली आहेत. आयआयटी खरगपूरने यंदा या परीक्षेचे नियमन केले होते. पुढील प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून (१६ ऑक्टोबर) सुरू होणार आहे.

विभागवार प्रथम विद्यार्थी (देशपातळीवरील स्थान)

आयआयटी दिल्ली .. मृदुल अगरवाल (१)

आयआयटी हैदराबाद .. रामस्वामी रेड्डी (४)

आयआयटी मुंबई .. नमन सोनी (६)

आयआयटी रुडकी.. चैतन्य अगरवाल (८)

आयआयटी कानपूर .. यश विराणी (३७)

आयआयटी खरगपूर .. अक्षत गोयल (४४)

विभागवार प्रथम विद्यार्थिनी (देशपातळीवरील स्थान)

आयआयटी दिल्ली .. काव्या चोप्रा (९८)

आयआयटी हैदराबाद .. भावना पल्ले (१०७)

आयआयटी खरगपूर .. बेथिना चौधरी (१४८)

आयआयटी मुंबई .. नीरजा पाटील (२६६)

आयआयटी कानपूर .. श्रेया तिवारी (२७९)

आयआयटी रुडकी.. दीपाशा (७१८)