अमृतसर एक्सप्रेसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात ट्रेनमधून पडून मरण पावलेल्या शैला शिंपी यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात कल्याण गुन्हे शाखा ३ ला यश आले आहे. १२ ऑगस्ट रोजी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली होती.
कळवा येथे राहणाऱ्या शैला शिंपी (५२) पती सोपान शिंपी (६२) यांच्यासह रक्षाबंधनासाठी धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. ११ ऑगस्टला त्या अमृतसर एक्सप्रेसने घरी परतत होत्या. १२ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांची गाडी ठाणे थानकापासून काही अंतरावर सिग्नल लागल्यामुळे थांबली होती. त्यावेळी स्थानकावर उतरण्यासाठी आपले सामान घेऊन सोपान दांपत्य दारात येऊन थांबले होते. त्यावेळी जिन्यात एक तरुण उभा होता. गाडी सुरू होताच त्या तरुणाने शैला यांच्या हातावर प्रहार करत हातातील पर्स खेचली आणि गाडीतून उडी टाकून पळ काढला. त्या हल्ल्याने शैला शिंपी खाली पडल्या. त्यांच्या पतीने साखळी ओढून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेन ठाणे स्थानकात जाऊन थांबली. डोक्याला मार लागल्याने शैला यांचा मृत्यू झाला होता.
..मोबाईलमुळे पकडले मारेकरी
कसलाच दुवा नसल्याने रेल्वे पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेचे सर्व युनिट या प्रकरणाचा तपास करत होते. शैला यांच्या पर्समध्ये ३७० रुपये आणि एक मोबाईल होता. चोरांनी त्या मोबाईलवरून शिंपी यांच्या घरच्या लॅण्डलाईनवर फोन करून हा मोबाईल असलेला महिलेचा ट्रेनमध्ये पडून मृत्यू झाला आहे, असे सांगितले होते. कल्याण गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ आणि त्यांच्या पथकाने हा मोबाईल दुवा मानून तपास सुरू केला. त्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी केल्यांतर खारेगाव येथून हा फोन आल्याचे समजले. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर पिंजून काढला रेल्वेत गुन्हे करणाऱ्यांचा शोध सुरू केला.
अखेर  लक्ष्मण उर्फ पप्प्या शिवाजी खताळा (१९) आणि त्याचा साथीदार विशाल उर्फ बॉईल रमेश पाटील (१८) याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम दिवेकर, पोलीस उपनिरीक्षक करंजुले आदींच्या पथकाने शिंपी यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढले.