येत्या सात दिवसांत मुंबईत स्फोट घडवू, असा धमकीचा संदेश देणारे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे ट्विटर खाते बनावट असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. बोधगया येथील स्फोटाची जबाबदारी स्वीकारत मुंबईत स्फोट घडविणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा व  दहशतवाद विरोधी पथक त्याचा तपास करत आहेत.
  इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने ट्विटर खात्यावरून मुंबईत सात दिवसांत स्फोट घडवू अशी धमकी दिली होती. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने या ट्विटवरून धमकीचा तपास सुरू केला असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली.
मुंबईला धोका, पोलीस सतर्क
मुंबईतील महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिराला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. याबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांचे प्रभारी प्रवक्ते पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी सांगितले की, या मंदिरांची सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील संवदेनशील स्थळांवरही कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.