पंचम निषाद आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रात:स्वर’ या मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या स्वराने श्रोते मंत्रमुग्ध झाले. तीन तंबोरे, तबला, पखवाज आणि संवादिनीच्या साथीने मुकुल यांनी उपस्थित रसिकांवर सुरांची बरसात केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरच्या आवारात असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात मुकुल शिवपुत्र यांचे गायन ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि अन्य मान्यवर या मैफलीला उपस्थित होते.
सुरुवातीच्या आलापीनंतर मुकुल यांनी ‘अहीर भैरव’ त्यानंतर ‘देव गंधार’च्या अंगाने थोडा वेळ ‘देस’ही सादर केला. नुकतीच होळी होऊन गेल्याने ‘होरी’ही सादर झाला. फक्त शब्द निर्गुणी भजनाचे आणि आविष्कार होरीच्या थाटाने जाणारा, असे त्याचे वेगळेपण होते. रंगलेल्या या मैफलीची सांगता शिवपुत्र यांनी कुमार गंधर्व यांच्या ‘तुकाराम दर्शन’मधील ‘हे चि माझे तप, हे चि माझे दान, हे चि अनुष्ठान नाम तुझे’ या संत तुकारामांच्या अभंगाने केली. या कार्यक्रमाच्या दिवशी शिवपुत्र यांचा साठावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने ‘हंसध्वनी’ या संस्थेतर्फे त्यांना पुणेरी पगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukul shivputra pl deshpande maharashtra kala academy
First published on: 27-03-2016 at 01:22 IST