मुंबईच्या एका बारमध्ये बारबाला लपवण्यासाठी शौचालयात तयार करण्यात आलेली गुहा डीसीपी शिवदीप लांडे यांनी शोधून काढली. शनिवारी रात्री मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना बारमध्ये पोलिसांनी छापा टाकला. शिवदीप लांडे गस्तीवर असताना, डान्सबारबाबत त्यांना टीप मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बारमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

या बारमध्ये बारबाला लपवण्यासाठी शौचालयात गुहा तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याकरिता बारबालांना या गुहेत लपवले जाते होते. या कारवाईत 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी येथून ८४ हजार रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे. अशाचप्रकारची कारवाई २६ मे रोजी दहिसरच्या शार्मिली बारमध्येही करण्यात आली होती. येथेही एक छुपं कपाट बनवलं होतं त्यामध्ये ११ बारबालांना लपवण्यात आलं होतं. त्यावेळी ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

४० वर्षीय शिवदीप लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मी नियमांचं पालन करतो. वरीष्ठांनी दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणं हे माझं काम आहे, आणि ही छापेमारीही त्याचाच परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया लांडे यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली. लांडे यांच्या दबंग कारवाईनंतर बिहारचा सिंघम अशी ओळख मिळवलेल्या IPS शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रातही धडक कारवाई सुरु केल्याची चर्चा आहे.