दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये जमा करण्याचा संकल्प ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने सोडताच अनेक गणेशोत्सव मंडळे पुढे आली आहेत. तसेच आता खुद्द धर्मादाय आयुक्तांनी या मदतयज्ञासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांकडून ५० कोटी रुपये, तर मुंबईतून ५ कोटी रुपये निधी उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
गणेश चतुर्दशीच्या निमित्ताने गुरुवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात आणि घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. लहरी पावसामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक विभागांतील नागरिक दुष्काळात होरपळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे काटोकेरपणे नियोजन करण्याची वेळ ओढवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रावर आपत्ती कोसळल्यानंतर सामाजिक बांधिलकीने गणेशोत्सव मंडळे मदतीसाठी धाव घेत आली आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’चे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दुष्काळग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन मंडळांना केले होते. त्याचबरोबर मदतीसाठी एक कोटी रुपये निधी जमविण्याचा संकल्पही सोडला होता. आता या मदतयज्ञाला धर्मादाय आयुक्त शशिकांत भानुदास सावळे यांनीही हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांची नोंदणी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात केली जाते. तसेच गणेशोत्सवानंतर जमा-खर्चाचा ताळेबंद मंडळांना धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सादर करावा लागतो. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे धर्मादाय आयुक्तालयाच्या संपर्कात असतात. दुष्काळग्रस्तांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय शशिकांत साळवे यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्तांच्या या मदतयज्ञामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांकडून ५० कोटी निधी गोळा करून तो मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्याची योजना आहे. मुंबईमधील मंडळांकडून ५ कोटी निधी जमा करण्यात येणार आहेत.
भरीव निधी गोळा होईल
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच काही छोटय़ा-मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी समन्वय समिती आणि धर्मादाय आयुक्तांकडे दुष्काळग्रस्तांना जमेल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आरंभलेल्या मदतयज्ञामध्ये भरीव निधी गोळा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शशिकांत भानुदास सावळे, धर्मादाय आयुक्त