मुंबईसह राज्यभरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच ‘फेरीवाला क्षेत्र’ तयार करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत पालिकेकडून अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार ८५ ते ८६ हजार फेरीवाल्यांना शहरात जागा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. यासाठी पालिकेने फेरीवाला क्षेत्राची विभागनिहाय यादी तयार केली आहे. यामध्ये दादरमध्ये राज ठाकरे राहत असलेल्या कृष्णकुंज निवासस्थानाच्या समोरच्या आणि मागच्या बाजूला असणाऱ्या दोन फेरीवाला क्षेत्रांचा समावेश आहे. एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सध्या या रस्त्यांवर एकही फेरीवाला बसत नाही.
मनसेने पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला असून या परिसरात शाळा असल्याने हे नियमांचे उल्लंघन ठरत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाला क्षेत्रांपैकी अनेक जागा या अनावश्यक आहेत. यापैकी अनेक रस्त्यांवर सध्यादेखील फेरीवाले बसत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुद्दाम राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेने केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कृष्णकुंजवर मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.