कालपासून बेपत्ता असलेल्या पत्रकार योगेश पवार याचा मृतदेह अखेर शनिवारी संध्याकाळी ढिगाऱ्यात सापडला. शुक्रवारी सकाळी त्याच्या वडिलांचा मृतदेह सापडला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. ढिगाऱ्यातून काही लोक जिंवत निघत असल्याने योगेश सुद्धा सुखरुप बाहेर येईल अशी आशा त्याच्या नातेवाईक आणि मित्रांना होती. पण संध्याकाळी त्याचा मृतदेह पाहून सर्वाचाच बांध तुटला.
योगेश या पालिका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वडील अनंत पवार यांच्यासह रहात होता. पूर्वी अनंत पवार कामगार नगरमध्ये रहात होते. त्या जागेचा पुनर्विकास होणार असल्याने ते डॉकयार्ड रोड येथे रहायला आले. याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर अनंत पवार यांचे चुलत भाऊ अशोक पवार रहात होते.
या दुर्घटनेत अशोक पवार, त्यांच्या पत्नी जयश्री पवार, आई सुभद्रा पवार, बाळंतपणासाठी आलेली नमिता पवार, निलम पवार यांचा मृत्यू झाला.त्यांचा मुलगा तुषार पवार कामासाठी बाहेर पडल्याने तो बचावल्याचे त्याच्या काकांनी सांगितले.