scorecardresearch

Premium

शहरबात : उरली फक्त प्रदर्शननगरी..!

फिनिक्स मिल्स संकुलात पांढऱ्या रंगात सजविलेल्या गिरणीच्या जुन्या धुरांडय़ाने हबचे लक्ष वेधून घेतले

शहरबात : उरली फक्त प्रदर्शननगरी..!

पारले प्रॉडक्ट्सने पाल्र्यातील पारले-जी बिस्किटांचे उत्पादनाचे सुपरिचित ठिकाण मुंबईबाहेर हलवीत असल्याची घोषणा केली. विक्रोळीची गोदरेज, कांदिवलीची मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र आणि पवईच्या एलअ‍ॅण्डटीनेही आपापली उत्पादने मुंबईतून केव्हाच स्थलांतरित केली आहेत. मुंबई शहर कारखानदारीसाठी उपयुक्त आणि सोयीचे राहिलेले नाही काय? आधी मुंबईतील जर्जर पायाभूत सोयीसुविधा उद्योगातील नव्या उत्पादन बदलांशी सुसंगत नव्हत्या. पुढे नजीकच्या बंदरापर्यंत म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट अथवा जेएनपीटीला तयार अवजड सामग्री हलविताना, मुंबईतील रस्त्यावरील गजबजाट, आडवे-तिडवे उभे राहिलेले उड्डाणपुलं अडसर ठरू लागली.

हब व्हॅन वेश्र्च. नाव भारी आहे. अर्थातच फिरंगी आहे. तोडकं-मोडकं बोलतो पण मराठीत बोललेलं त्याला पुरेपूर समजते. पठ्ठय़ा पुण्याच्या मराठी कुटुंबाचा जामातच म्हटल्यावर भाषा न समजायला काय झाले? पण त्याची आणि मराठीची सोयरिक इतक्यापुरतीच नाही. ८२च्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपादरम्यान प्रभादेवीला कामगारांच्या चाळीत, त्यांच्यासह बठकीच्या खोलीत हब सहा महिने राहिला आहे. एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून संपाच्या जीवनपलूचा तो अभ्यास करीत होता. ‘द बॉम्बे टेक्स्टाइल स्ट्राइक- १९८२-८३’ असे त्या ऐतिहासिक संपाविषयी त्याचे संशोधन १९९२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे पुस्तकरूपात प्रकाशित झाले. इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांना उपलब्ध असलेले त्या वेळच्या संपाची कहाणी सांगणारे ते कदाचित एकमेव पुस्तक असावे. गेल्या ४२ वर्षांत हबचे अनेकवार भारतात येणे-जाणे सुरू आहे. पण गेल्या वर्षी तो खास फुरसतीने मुंबईच्या फेरफटक्यासाठी आला. मुंबईचा बदललेला नूर पाहून त्याला हरवल्यासारखेच झाले.
फिनिक्स मिल्स संकुलात पांढऱ्या रंगात सजविलेल्या गिरणीच्या जुन्या धुरांडय़ाने हबचे लक्ष वेधून घेतले. ‘पॅलेडियम मॉल’च्या अजब-गजब दुनियेत गतकाळाचा संदर्भ म्हणून फिनिक्स मिल्सचे धुरांडे कडा पहारा देताना पाहण्यासारखी दुसरी वेदना नाही, असे त्याचे मत बनले. तो म्हणतो- ‘‘पूर्वाश्रमीच्या गिरणगावांतून हिंडताना, मला या औद्योगिक क्षेत्राच्या गतवैभवाशी नाते सांगणाऱ्या जुन्या खुणा- अनेक दुर्दैवी घटना आणि परिस्थितीचे फटकारे झेलूनही जशाच्या तशा आजही आढळल्या. परंतु सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात वाढलेल्या आणि शॉपिंग मॉल्सच्या झगमगाटाने डोळे दीपलेल्या नव्या पिढीला हा गतकाळ ज्ञात असेल? रंगरंगोटी केलेले फिनिक्स मिल्सचे धुरांडे म्हणजे या चमचमत्या दुनियेतील विचित्र सूतकी ‘आभूषण’च, त्याच्या सभोवार फिरत असलेल्या रेडी-टू-बाय तरुणाईला त्याबद्दल खरेच काही प्रश्न पडत नसावेत काय? ही वास्तू म्हणजे मुंबईच्या इतिहासाचे केंद्र आहे हे त्यांच्या ध्यानी असेल? धडधडत्या यंत्रांवर राबणाऱ्या श्रमावर व्यापारी उद्दिष्टांनी मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून ते त्याकडे पाहत असतील काय? की त्या जुन्या श्रमसंस्कृती, गिरणगावाच्या इतिहासाला ते धुरांडे वाकुल्या दाखवत खडे असल्याचे त्यांना भासत असेल?’’
पण हबने इतके व्याकुळ होण्यासारखे खरेच काय घडले आहे? जगाच्या इतिहासात सर्वत्रच जुन्या औद्योगिक शहरांची अशी वासलात लागली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत शहर आणि जगातील पाचवे सर्वात मोठे शहर असलेल्या महामुंबईचा त्याला अपवाद कसा असेल? ‘पण, शहराच्या घडणीचा सांधा निखळून पडावा; शहराला आकार देणारा पहिला नागरिक (गिरणी कामगार) हद्दपार केला जावा, असे अन्यत्र कुठे घडलेले नाही.’ हबचे हे उत्तर म्हणजे बेटा-बेटांच्या मुंबईचे कोळ्यांच्या खेडय़ांपासून ते आजच्या मेट्रो शहरांपर्यंतच्या प्रवासातील अपूर्णतेवर टाकला गेलेला झगझगीतच प्रकाशच म्हणता येईल.
कधी काळी उद्योगधंद्यांचे केंद्र असलेल्या मुंबईत आता नावापुरतीही कारखानदारी उरलेली नाही. फार मागे जायची गरज नाही. गेल्या फार तर तीन-साडेतीन दशकांचा हा घटनाक्रम आहे. म्हणजे अगदी मागल्या पिढीचाच. कापड उद्योग, रसायने, औषधी उद्योग, बडे अभियांत्रिकी व वाहन उद्योग स्वत:त बदल घडवीत एक एक करीत स्थलांतरित झाले. त्यांच्यावर अवलंबित छोटय़ा पूरक कारखान्यांनीही मग माना टाकल्या. कापड गिरण्या आजारी पडणे ही धूर्त खेळी होती, हे आता स्पष्टच होत आहे. संप हे केवळ निमित्त ठरले. आजार-दिवाळखोरी ही बँका व वित्तसंस्थांकडून घेतलेली मोठाली कर्जे बुडविण्याचे सोंग होते. भांडवलप्रवण, हजारो कामगार कामाला ठेवून, प्रचंड मोठय़ा जमिनीवर उद्योग चालविणे यापेक्षा वित्तीय सेवा क्षेत्रातील लाभदायी संधी प्रस्थापित उद्योगपतींना खुणावू लागल्या होत्या. नव्हे मुंबईतील जमिनीला आलेले मोल तोंडाला पाणी आणणारे ठरत गेले. पारंपरिक कारखानदारी करणाऱ्या उद्योग समूहाच्याच मग वित्तीय सेवा कंपन्या उभ्या राहिल्या. हेच उद्योगपती पुढे घरबांधणी क्षेत्रात आले. भाकड-भकास गिरण्यांच्या जागा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनल्या. वारशानेच म्हणा पण कामगारविरोधी चरित्र घेऊनच त्यांचे नवीन सेवा उद्योग, वाणिज्य संकुले, मॉल्स उभे राहिले. त्यांनी देशोधडीला लावले गेलेले कामगार व त्यांचे कुटुंबीयच मग सुरक्षारक्षक, सेल्समन, कुरियरवाले, गाडीवान, शिपाई अथवा मोलकरणी, फेरीवाले-विक्रेते, घरगडी बनले.
ज्यांना ही नामुष्की सोसवली नाही ते मुंबईकडे पाठ करून आपापल्या गावी परतले. कायमचेच, परत न फिरण्यासाठी. कामगारांचे कुटुंबच मोडीत निघाले नाही, तर कापड गिरण्यांच्या आधाराने शतकभरात विकसित होत गेलेली येथील संपूर्ण भागाच्या जीवनपद्धतीचा आत्माच मारला गेला. भजन, मेळे, लेझीम, दशावतार, तमाशा, शाहिरी, लोकनाटय़, हुतूतू आणि आटय़ापाटय़ा हा गिरणगावचा जिवंत सांस्कृतिक धागाही विरळ बनत गेला. याच धाग्यातून जेथे अनेक कलाकार, क्रीडापटू घडविले गेले, तेथे लुंपेन-टपोरींच्या फौजा घडत आहेत. ६५ कापड गिरण्या आणि देशोधडीला लागलेल्या अडीच-तीन लाख कामगारांचा रोजगार नाहीसे होण्याच्या स्थित्यंतराचे हे महादु:ख आहे.
कापड उद्योगाच्या अस्तासह, जवळपास त्याच चालीवर अन्य अनेक बडे उद्योग मुंबईबाहेर हलविले गेले. सिबा-गायगी, ह्य़ूम पाइप, रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास, ग्लॅक्सो, हिंदुस्थान लिव्हर या अगदी मध्य-मुंबईतील कारखानदारीच्या खुणा आज शोधायच्या म्हटल्या तरी आज सापडणार नाहीत. परवाच पारले प्रॉडक्ट्सने पाल्र्यातील पारले-जी बिस्किटांचे उत्पादनाचे सुपरिचित ठिकाण मुंबईबाहेर हलवीत असल्याची घोषणा केली. विक्रोळीची गोदरेज, कांदिवलीची मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र आणि पवईच्या एलअ‍ॅण्डटीनेही आपापली उत्पादने मुंबईतून केव्हाच स्थलांतरित केली आहेत. तिन्ही कंपन्या आज बांधकाम व्यवसायात असल्याने जुन्या कारखान्यांच्या जमिनीवर आज काय उभारले गेले आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. मूळ मुंबईतून भांडुपमध्ये हललेले औषधी व रसायन उद्योग, तेथून आणखी ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात आणि पुढे न जाणो आणखी कोणत्या प्रवासाला गेले याचा ठाव नाही. मुंबई शहर कारखानदारीसाठी उपयुक्त आणि सोयीचे राहिलेले नाही काय? आधी मुंबईतील जर्जर पायाभूत सोयीसुविधा उद्योगातील नव्या उत्पादन बदलांशी सुसंगत नव्हत्या. पुढे नजीकच्या बंदरापर्यंत म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट अथवा जेएनपीटीला तयार अवजड सामग्री हलविताना, मुंबईतील रस्त्यावरील गजबजाट, आडवे-तिडवे उभे राहिलेले उड्डाणपुलं अडसर ठरू लागली. एलअ‍ॅण्ड टीला यातून ऊर्जा प्रकल्पांसाठी अवजड संयंत्रांचे उत्पादन पवईतून गुजरातमधील हाजिराला हलविण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
एफएसआय अर्थात चटई निर्देशांकाचे प्रमाण किती, ही बाब मुंबईच्या नगर विकासाच्या केंद्रस्थानी आली. सरकारचे अग्रक्रम बदलले. जुन्या गिरणी कामगारांना घरे मिळतील ही आस दाखविली गेल्याने त्यांना राजकीय स्वीकृतीही मिळाली. पण वर्षांमागून वष्रे लोटली तरी हे स्वप्न काही केल्या वास्तवात उतरताना दिसले नाही. गिरण्यांच्या जमिनीची तर केव्हाच वासलात लावली गेली आहे. मुंबईचे उद्योगनगरी हे पूर्वापार रूप, आता या शहरात भरणाऱ्या उद्योग प्रदर्शन आणि व्यापार परिषदांपुरतेच मर्यादित राहिले आहे. युरोपच्या चष्म्यातून आपल्याकडील औद्योगिक प्रगतीची धोरणे आखली गेली; त्याच चष्म्यातून गतकाळातील औद्योगिक शहरांचे दु:खद संक्रमण आणि नव्याने फेरघडणाचा परिपाठही जाणून घ्यायला हवा.
सचिन रोहेकर – Sachin.rohekar@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai city not suitable for manufacturing plant

First published on: 02-08-2016 at 03:23 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×