मुंबई : राज्य सरकारने बुधवारपासून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी त्याच्या अंमलबजावणीला वेळ लागणार आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. शिवाय बहुतांशी विद्यार्थ्यांच्या दोन लसमात्रा झालेल्या नाहीत. त्यामुळे थेट दिवाळीच्या सुट्टीनंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोलवण्याचा महाविद्यालयांचा मानस आहे.

गेले दीड वर्ष ऑनलाइन शिक्षणामुळे महाविद्यालयातील अनुभवांना विद्यार्थी मुकले आहेत. कट्टय़ावरच्या गमतीजमती, धमाल, मस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका या सगळय़ाची प्रचंड उत्कंठा त्यांच्या मनात आहे. राज्य सरकारने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु प्रत्यक्ष महाविद्यालायत जाण्यासाठी त्यांना अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

घाईघाईत निर्णयाची अंमलबजावणी करण्यापेक्षा पूर्वनियोजन करून दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू केली जातील, अशी माहिती मुंबईतील महाविद्यालयांकडून मिळाली.

‘पदवीच्या द्वितीय वर्षांच्या परीक्षा सुरू आहेत, तर तृतीय वर्षांतील विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांमध्ये बरेच विद्यार्थी १८ वर्षांखालील असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. नियमावलीनुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण सक्तीचे आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच केला जाईल,’ असे रुपारेल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप मस्के यांनी सांगितले.

बहुतांशी महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती असून केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी बोलावले जात आहे. काही महाविद्यालयांनी बुधवारपासून केवळ पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना बोलावले आहे.

लसीकरणाला प्राधान्य

पदवीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे असले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी केवळ एकच लस घेतल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांच्या दोन्ही लसमात्रा पूर्ण होतील याकडे महाविद्यालय लक्ष देणार असून आपापल्या विभागातील साहाय्यक आयुक्तांशी बोलून महाविद्यालये लसीकरण मोहीम राबवणार आहे.

एमएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे असल्याने त्यांना तातडीने बोलवणार आहोत. पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. शिवाय आता दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू होतील. विद्यार्थी येण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयांनाही पूर्वतयारीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू होतील.    

अनुश्री लोकुर, प्र. प्राचार्या, रुईया स्वायत्त महाविद्यालय