संदीप आचार्य, लोकसत्ता

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने परस्पर खासगी पंचतारांकित रुग्णालयाशी खाट मिळण्यासाठी संपर्क साधला. पण खाट मिळू शकली नाही. एका ज्येष्ठ नेत्यालाही बड्या खासगी रुग्णालयात खाट नसल्याचे उत्तर मिळाले. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधताच योग्य माहिती दिल्यानंतर त्याच रुग्णालयात त्यांना उपचारासाठी खाट मिळाली. करोना वेगाने वाढत असल्यामुळे प्रयोगशाळांनी पालिकेला न कळवता परस्पर करोनाचा अहवाल दिल्यास संबंधित प्रयोगशाळेचा परवाना रद्द करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. तसेच करोना रुग्णांना थेट खाट देण्यावर पालिकेने आता निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही ‘करोना व्हीआयपी रुग्णा’ला महापालिकेच्याच माध्यमातून रुग्णालयांत खाट उपलब्ध करून दिली जाणार आहे.

..तर प्रयोगशाळेचा परवाना रद्द

मुंबईत गेल्या काही दिवसात रोज पाच ते सहा हजार करोना रुग्ण आढळू लागले आहेत. यातील लक्षण नसलेले बरेच रुग्ण परस्पर प्रयोगशाळांतून चाचणी अहवाल घेऊन स्वतःला खासगी रुग्णालयात दाखल करून घेतात. यासाठी कधी मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रुग्णालय व प्रयोगशाळांवर दबावही आणले जातात. यातून ज्या करोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे गरजेचे आहे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच पालिकेने २४ विभागांत स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षत योग्य माहिती अभावी गोंधळाचे वातावरण निर्माण होते. परिणामी यापुढे एकाही प्रयोगशाळेने पालिकेला न कळवता परस्पर रुग्णाला करोना अहवाल दिल्यास संबंधित प्रयोगशाळेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी घेतला आहे.

नियंत्रण कक्षातूनच खाटांचे नियोजन

केवळ लक्षण असलेल्या रुग्णांनाच तेही पालिका नियंत्रण कक्षच्या माध्यमातून खाट उपलब्ध करून दिली जाईल, असे आदेश जारी केले आहेत. याबाबत आयुक्त इक्बालसिंग चहल यांना विचारले असता ते म्हणाले, “करोना रुग्ण वेगाने वाढत असल्याने आम्ही रुग्णालयीन खाटा वाढविण्याबरोबर अनेक निर्णय घेत आहोत. सध्या पालिकेकडे १३ हजार २४५ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ३०६२ खाटा आजही रिक्त आहेत. तथापि आगामी काळातील गरज तसेच लक्षण नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयीन खाटा अडवू नयेत व गरजू रुग्णांनाच त्या प्राधान्याने मिळाव्या यासाठी परस्पर रुग्णांना खाटा देऊ नये तसेच पालिका नियंत्रण कक्षच्या माध्यमातूनच खाटांचे नियोजन करण्याचे आदेश जारी केल्याचे” आयुक्त चहल यांनी सांगितले.

“यापुढे सनदी अधिकारी असो की अन्य कोणी व्हीआयपी असो, कोणालाही परस्पर प्रयोगशाळातून करोना चाचणी अहवाल दिले जाणार नाहीत. या सर्व प्रयोगशाळांना पालिकेला अहवाल कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेला न कळवता एखाद्या व्यक्तीला परस्पर चाचणी अहवाल दिल्यास संबंधित प्रयोगशाळेचा परवाना रद्द केला जाईल”, असेही आयुक्तांनी सांगितले.

“बहुतेक रुग्णांचा विशिष्ट खाजगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आग्रह असतो. तथापि पालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षमधील डॉक्टर रुग्ण वा नातेवाईकांशी बोलून रुग्णालयात दाखल करण्याबाबत नियोजन करतील” असेही आयुक्त म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यास सांगितले आहे. त्यानुसार एकीकडे लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी संस्थात्मक खाटा वाढवणे तसेच रुग्णालयातील खाटा वाढविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत २२ हजार रुग्णालयीन खाटा तसेच खाजगी रुग्णालयातील सात हजार खाटा उपलब्ध झालेल्या असतील असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला.

याचप्रमाणे औषधांचा साठा, प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांची व्यवस्था केली जाईल. एकीकडे रुग्णालयीन व्यवस्था वाढवताना दुसरीकडे लसीकरणाचा वेगही पालिकेने वाढवल्याचे आयुक्त म्हणाले.