तब्बल दोन लाखांहून अधिक मुंबईकरांना दररोज कोणत्याही गोंधळाविना घरचे सुग्रास भोजन त्यांच्या त्यांच्या कार्यालयांमध्ये पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनी आता एका नव्या उपक्रमाला हातभार लावत आपली सामाजिक बांधीलकी दाखवून दिली आहे. मुंबईतील क्षयरोग रुग्णांना सकस भोजन पुरविण्याची महानगरपालिकेची योजना आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही योजना राबविली जाणार आहे. या संस्थेतर्फे तयार केले जाणारे अन्न रुग्णांच्या घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी डबेवाले उचलणार आहेत.
क्षयरोग हा एक जीवघेणा संसर्गजन्य आजार आहे. परंतु, या रोगावर औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यासाठीची औषधे नियमितपणे घेतल्यास या रोगावर मात करता येते. पालिकेतर्फे यासाठीचे उपचार व औषधे तर मोफत पुरविली जातात. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे पाच हजार क्षयरोग रुग्ण आहेत. परंतु, तरीही क्षयरोगी मृत्यूंचे प्रमाण मुंबईत जास्त आहे. उपचार आणि औषधे पुरवूनही मृत्यूंचे प्रमाण जास्त का हे शोधण्याचा पालिकेने प्रयत्न केला. त्यावेळी असे लक्षात आले की क्षयरोग होणारे बहुतांश रुग्ण हे गरीब आहेत. त्यांना सकस भोजन न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू होतो. सकस भोजन तर दूरच अनेकदा साधे भोजनही त्यांना मिळत नाही. अनेकदा तो उपाशी किंवा अर्धपोटी असतो. म्हणून महानगरपालिकेने अशा रुग्णांना सकस भोजन पुरविण्याचे ठरविले आहे. कारण रुग्णाने औषधांबरोबरच सकस भोजन घेतले तरच त्याचा परिणाम होऊन प्रकृती सुधारते.
ही योजना राबविण्याकरिता एका स्वयंसेवी संस्थेची मदत पालिकेला लाभली आहे. ही संस्था रुग्णांकरिता अन्न तयार करून देईल. मात्र, हे अन्न रुग्णांना घरोघरी नेऊन पोहचविणार कोण, असा प्रश्न पालिकेसमोर ठाकला होता. त्याच वेळी ‘मुंबई डबेवाला संघटना’ पालिकेच्या आणि पर्यायाने या रुग्णांच्या मदतीला धावून आली आहे.

केवळ रविवारचा प्रश्न
‘मुंबईत तब्बल दोन लाख जणांना आम्ही घरचे भोजन दररोज त्यांच्या कार्यालयात पोहोचवीत असतो. त्यामुळे पाच हजार क्षयरोग रुग्णांना घरपोच अन्न पुरविणे आम्हाला कठीण नाही,’ अशा शब्दांत संघटनेचे सरचिटणीस सुभाष तळेकर यांनी सांगितले. यासाठीचा वाहतूक, आदीकरिता म्हणून जितका खर्च येईल तितकाच आम्ही घेणार आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. केवळ रविवारी आमचा सुट्टीचा दिवस असल्याने त्या दिवशी काय करायचे याबद्दल आमची पालिकेशी बोलणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.