मुंबई:  मुंबईत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात स्वाईन फ्लूचे आणखी ५८, तर डेंग्यूचे ४६ रुग्ण आढळले आहेत. हिवतापाचेही २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत करोनाबरोबरच इतर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हिवताप, लेप्टोचे, डेंग्यू,  गॅस्ट्रो,  कावीळच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. दुसऱ्या आठवड्यातही तशीच परिस्थिती आहे. काही भागात हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे. मात्र आतापर्यंत या आजाराने एकही रुग्ण मृत पावल्याची नोंद नाही. 

स्वाईन फ्लूची लक्षणे

स्वाइन फ्लूमध्ये सामान्यतः किरकोळ सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. तसेच स्वाईन फ्लू झालेल्यांमध्ये तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे आढळतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काही व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे आढळतात. 

आजार ……ऑगस्ट महिन्यातील रुग्ण…..जानेवारीपासून आतापर्यंतचे एकूण रुग्ण

हिवताप  …..…. ४१२………….. २२१८

लेप्टो ……………… २९ ………….. १२९

डेंग्यू ………………. ७३ ………….. २५७

गॅस्टो …………….. २३७ ………… ३८२२

कावीळ (हेपेटायटीस) ……. २६………… ३४४

चिकुनगुन्या …… २ …………… ९

स्वाईन फ्लू ….. १३८ …. …. २४७