‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी शनिवारी; पात्र ठरलेल्या सहा महाविद्यालयांत उत्साह

महाविद्यालयीन एकांकिका विश्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागाच्या प्राथमिक फे रीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा महाविद्यालयांतील स्पर्धक कलाकारांत अमाप उत्साह संचारला आहे. संहिता आणि सादरीकरणाच्या पहिल्या कसोटीवर खरे उतरलेल्या या कलाकारांनी आता नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या तांत्रिक बाजूंसोबतच आपापल्या भूमिकांवरही अधिक मेहनत घेण्यास तयारी सुरू केली आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीत प्रामुख्याने आशय, विषय, अभिनय आणि दिग्दर्शन यांचे अधिक बारकाईने परीक्षण केले जाते. मात्र विभागीय अंतिम फेरी रंगमंचावर सादर होणार असल्याने प्रकाशयोजना या महत्त्वाच्या पैलूवर स्पर्धकांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. शिवाय पहिल्या फेरीत अर्धवट असलेले नेपथ्यही पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे संहितेच्या गरजेनुसार लाकडी चौकटी बनवणे, कापडी फ्लेक्स रंगवणे, प्रॉपर्टी जमा करणे अशा गोष्टींनी तालमींच्या वातावरणात एक वेगळाच रंग भरला आहे. प्रत्येक पात्राचा पोशाख कसा असावा, त्याची रंगभूषा कशी असावी यावर दिग्दर्शक, कलाकार, रंगभूषाकार यांची खलबते सुरू आहेत.

लोकांकिकाची दुसरी फेरी ही स्पर्धकांसाठी झालेल्या चुका सुधारण्याची संधी असते. या संधीचे सोने करण्यासाठी टीममधील प्रत्येक जण धडपडतो आहे. ‘सादर झालेल्या सर्व एकांकिकांमधून नावीन्याचा प्रयत्न दिसून आला. नाटय़ सादरीकरण अतिशय सफाईदार झाले. मात्र या तरुण नाटय़कर्मीनी वाचिक अभिनयासारख्या नाटकाच्या मूलभूत घटकांवर काम करणे महत्त्वाचे आहे,’ असे मत मुंबई विभागीय प्राथमिक फेरीचे परीक्षक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी नोंदवले. तर ‘यंदा लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांच्या आशयामध्ये वैविध्य दिसून आले,’ असे परीक्षक नीळकंठ कदम म्हणाले.  आयरिस प्रॉडक्शनच्या प्रतिमा कुलकर्णीही म्हणाल्या ‘लोकसत्ता लोकांकिके ची प्राथमिक फे री मी शक्यतो चुकवत नाही. नाटक हे आपल्या मनातील खदखद, पडलेले प्रश्न मांडायचे माध्यम आहे, असे या तरुण रंगकर्मीना वाटते हीच समाधानाची बाब आहे‘, असे त्या म्हणाल्या.

विभागीय अंतिम फेरीत निवड झाल्यामुळे उत्साह वाढला आहे. प्रकाशयोजना महत्त्वाची आहे. पात्रांची जागा ठरवणे, वेशभूषा यांवर मेहनत घेतली जात आहे. संगीत चांगले व्हावे यासाठीही प्रयत्न करत आहोत.

– अमित पाटील, गुरुनानक खालसा महाविद्यालय (मिस अ‍ॅन्ड मिसेस फिफ्टी फिफ्टी)

प्राथमिक फेरीतील परीक्षकांना आमच्या  एकांकिकेचा विषय आवडला.  त्यांच्या सूचना लक्षात घेऊन आम्ही विभागीय अंतिम फेरीत अधिक चांगल्या पद्धतीने कशी सादर करता येईल याचा विचार करत आहोत. काही दृश्यांमध्ये बदल करणार आहोत. शिवाय आमच्यात काही मुले नवीन आहेत.  विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाल्यामळे या मुलांना पहिल्यांदा रंगमंचावर काम करण्याची संधी मिळणार आहे. अनुभवी कलाकार म्हणून अशा मुलांना मार्गदर्शन करण्यात एक वेगळीच मजा आहे.

– राजस सुळे, डहाणूकर महाविद्यालय (हुतूतू)

प्राथमिक फेरीतील परीक्षकांना आमच्या  एकांकिकेचा विषय आवडला.  त्यांच्या सूचना लक्षात घेऊन आम्ही विभागीय अंतिम फेरीत अधिक चांगल्या पद्धतीने कशी सादर करता येईल याचा विचार करत आहोत. काही दृश्यांमध्ये बदल करणार आहोत. शिवाय आमच्यात काही मुले नवीन आहेत.  विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाल्यामळे या मुलांना पहिल्यांदा रंगमंचावर काम करण्याची संधी मिळणार आहे. अनुभवी कलाकार म्हणून अशा मुलांना मार्गदर्शन करण्यात एक वेगळीच मजा आहे.

– राजस सुळे, डहाणूकर महाविद्यालय (हुतूतू)

यावर्षी पहिल्यांदाच पाटकर महाविद्यालयाची एकांकिका लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहे.  त्यामुळे आता तालीमीतले गांभीर्य वाढले आहे. आम्ही इतर महाविद्यालयांच्या तुलनेत कमी वेळ तालीम करतो. दिग्दर्शकांचे म्हणणे आहे की, तालीम ही हसत-खेळत झाली पाहिजे.  त्यामुळे दुसऱ्या फेरीची तालीमही कलाकारांच्या सोयीनुसारच सुरु आहे. फ क्त नेपथ्यकारांची धावपळ वाढली आहे. शिवाय ४० मिनिटांत एकांकिका संपावी यासाठी प्रयत्न करत आहोत.

– ज्ञानदा खोत, पाटकर-वर्दे महाविद्यालय (पैठणी)

विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाल्याने उत्सुकता खूप वाढली आहे. गेली दोन वर्षे आमचे महाविद्यालय दुसरी फेरी जिंकून मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्त्व महाअंतिम फेरीत करत आहे. यावर्षी हॅट्ट्रिक करायची आहे. प्राथमिक फेरीत फक्त अभिनयाला महत्त्व होते. मात्र आता इतर तांत्रिक गोष्टींवरही मेहनत घ्यावी लागेल. सेटची तयारी तर सुरुच आहे, पण दुसऱ्या बाजूला भूमिकेनुसार पोशाख मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

– कोमल वंजारे, महर्षी दयानंद महाविद्यालय (तुरटी)

यावर्षां पहिल्यांदाच आम्ही लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत भाग घेत आहोत. लोकांकिकाच्या निमित्ताने अनेक दिग्गजांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे काहीही करुन उत्तमा सादरीकरण करुन महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचायचे आहे. तालमीतील वातावरण पूर्ण बदलून गेले आहे. एका बाजूला नेपथ्याचे काम सुरु  आहे तर दुसऱ्या बाजूला पात्र अधिक उठावदार करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.

– तेजस राऊत, वझे-केळकर महाविद्यालय (सेल्फीमग्नता)

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, के सरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहात आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.