मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पहाटेपासून उपनगरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवडाभरपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. पावसाने हवेत गारवा पसरला असून वातावरणही आल्हाददायी झाल्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत पाणीच पााणी झालं आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सांताक्रुज,अंधेरी, हिंदमाता, परेल, कुर्ला यासारख्या अनेक भागात ट्रफिक झालं असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळी अनेकजण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यातच कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी गुडघाभर साचलेल्या पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढावी लागत आहे. जास्तच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र तयार झालं आहे. सखल भागात साजलेले पाणी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणाचे मॅनहोल्सही उघडे करण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.

दरम्यान, हवामान विभागानं मुंबईसह उपनगरात पुढील काही दिवस पावासाचा अंदाज वर्तवला आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.