४५ वर्षांवरील १५ लाख नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत

मुंबई : पालिकेकडे लशींचा खडखडाट असून अद्यापही ४५ वर्षांवरील सुमारे १५ लाख नागरिक लशींच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी लसीकरण बंद असले तरी अनेक नागरिकांनी केंद्रावर हजेरी लावत संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यापासून केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात साठा प्राप्त होत असल्याने मुंबईलाही जूनच्या शेवटच्या आठवडय़ात लशींचा पुरेसा साठा मिळाला होता. परिणामी पालिकेच्या केंद्रांवर प्रतिदिन लसीकरणाची संख्या २० ते ३० हजारांवरून अगदी ८० ते ९० हजारांपर्यंत गेली. परंतु मागील चार दिवसांपासून पुन्हा लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने बुधवारी पालिकेच्या केंद्रांवर केवळ २५ हजार जणांचे लसीकरण होऊ शकले. पालिकेच्या लसीकरण केंद्रांतील साठा बुधवारी पूर्णच संपल्याने अखेर गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली.

शहरात कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे त्यांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु लशींचा साठाच पुरेसा नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना लस मिळू शकलेली नाही.

केवळ २ लाख ६१ जणांनाच दुसरी मात्रा

शहरात ६० वर्षांवरील सुमारे ९ लाख ४८ हजार जणांनी पहिली मात्रा घेतली असून ४ लाख ६० हजार जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे. ४५ ते ५९ वयोगटातील सुमारे १२ लाख ७३ हजार जणांनी लशीची पहिली मात्रा तर यातील केवळ २ लाख ६१ जणांना दुसरी मात्रा प्राप्त झाली आहे. ४५ वर्षांवरील सुमारे १५ लाख नागरिक अजून लशीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत.

जून महिन्यात पालिकेला आठ लाख लशींच्या मात्रा

जून महिन्यात पालिकेला सुमारे आठ लाख लशींच्या मात्रा प्राप्त झाल्या. पालिकेने दिवसाला ८० हजारांहूनही अधिक जणांचे लसीकरण केले. त्यामुळे हा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याने लगेचच संपून जातो. पालिकेची दिवसाला एक लाखाहूनही अधिक लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु त्या तुलनेत साठा येत नसल्यामुळे आम्हालाही लसीकरण वेगाने करता येत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आजही लसीकरण बंद राहण्याची शक्यता

मुंबईला गुरुवारी संध्याकाळी पाचपर्यंत लशीचा साठा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी उशिरापर्यंत लशींचा साठा मिळाला नाही तर शुक्रवारीही लसीकरण बंद ठेवावे लागेल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

लसीकरण केंद्रे दोन दिवसांपासून बंद

* शहरात लशींचा साठा पुरेसा नसल्याने लसीकरणाची काही केंद्रे गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत.  वरळीतील पोदार रुग्णालयातील केंद्र मागील तीन दिवसांपासून लससाठय़ाअभावी बंद आहे. या केंद्रावर मंगळवारपासून लस उपलब्ध नाही. त्यामुळे दरदिवशी लशीची विचारणा करण्यासाठी परिसरातील नागरिक या केंद्रावर गर्दी करत आहेत. कोव्हिशिल्ड लसमात्रा घेतलेल्या अनेकांना आता ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे दुसरी मात्रा घेण्यासाठी हे नागरिक केंद्रांवर चकरा मारत आहेत.  लस न मिळाल्याने अनेक जण केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालतात, असे पोदार रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याने सांगितले.

* वरळीतील राज्य कामगार विमा रुग्णालयातही बुधवारही लससाठा उपलब्ध नव्हता. आता पुढील लससाठा कधी मिळेल याची माहिती नाही. लससाठा संपल्याचे फलक प्रवेशद्वारावर लावले तरी काही जण विचारणा करतात. यातील अनेकांना समजावून माघारी पाठवावे लागते, असे या  रुग्णालयाचे डॉ. पंकज डांगे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai faces shortage of vaccines zws
First published on: 02-07-2021 at 00:46 IST