वाढत चाललेल्या उभ्या आडव्या मुंबईत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असले तरी अलीकडेच मंत्रालयाला लागलेल्या आगीबासून काळबादेवी येथील इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या बलीदानाने अग्निशमन दलालाच ‘फायरप्रूफ’ करण्याची गरज निर्माण झाली होती. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी ही गरज लक्षात घेऊन केवळ अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण न करता जे जवान व अधिकारी आगीशी झुंज घेतात त्यांच्या जीविताची काळजी घेणारे अनेक निर्णय महापालिकेच्या अर्थसंकल्पात घेतले आहेत.
मुंबईचे अग्निशमन दल हे देशातील सर्वात जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून त्याची स्थापना १८८७ मध्ये झाली. गेल्या दशकभरात देशातील विविध राज्यांमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये अग्निशमन दलाने मोलाची कामगिरी बजावली आहे. चक्रीवादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून ते मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्येही महत्त्वीचे योगदान देणाऱ्या अन्गिशमन दलाच्या जवानांच्या व्यथांना तसेच अडचणींची सोडवणूक मात्र म्हणावी तशी होत नव्हती. थेट आगीशी सामना करताना श्वनापासून ते स्वत:चा बचाव करत आगीत अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण तसेच साधनसामग्री मिळणे या जवानांना आवश्यक होते. काळबादेवी आगीनंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने एक समिती नेमून नेमक्या गरजाच शोध घेतला. आतापर्यंत जेव्हा जेव्हा दुर्घटना घडतात तेव्हा समिती नेमली जाते. त्याचा अहवालही येतो आणि नंतर सारे ठप्प.. सुदैवाने विद्यमान पालिका आयुक्त मेहता यांनी या अहवालाची गंभीर दखल घेऊन अग्निशमन दलाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी ३२३ कोटी रुपयांची तरतूद केली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीतील आगीत कर्तव्य बजावताना चार अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर नेमलेल्या सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालानुसार सर्व अधिकारी व जवानांची नियमित वैद्यकीय तपासणी, विशेष प्रशिक्षण, आवश्यक कवायती, आगीच्यावेळी अग्निशमन दलातील अधिकारी व जावांनांनी बजवायची भूमिका व जबाबदारी यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नियमपुस्तिका तयार करण्यात आली आहे. ९० मीटर उंचीचे हायड्रोलिक प्लॅटफॉर्म कार्यान्वित करण्यात आले असून वडाळा येथी श्वसन उपकरण गॅलरी उभारण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष धुरात काम करताना जवानांचे व्यावसायिक कौशल्य वाढणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुनी कालबाह्य़ इंजिन बदलून १६ कोटी ६५ लाख रुपयांची १६ नवीन फायर इंजिन घेण्यात आली आहेत. अद्ययावत व स्वयंचलित ट्रान्समीटरवर चालणाऱ्या या इंजिनमुळे दलाची कार्यक्षमता वाढणार आहे. अद्ययावत श्वसन उपकरण एअर कॉप्रेसर सह सहा श्वसन उपकरण वाहनांची खरेदी, रेस्क्यु बोटीसह अनेक बीड सेफ्टी उपकरणे खरेदी करून समुद्र किनाऱ्यांवर सहा निवडक ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आगीशी सामना करण्यासाठी तब्बल ४६ कोटी रुपयांचे अग्निरोधक गणवेशांची खरेदी करण्यात येणार असून ज्या ठिकाणी जवळ जवळ इमारती आहेत अथवा झोपडपट्टय़ांच्या ठिकाणी अग्निशमन दल पोहोचावे यासाठी ३१ कोटी रुपये खर्चून १७ क्विक रिस्पॉन्स बहुउद्देशीय वाहने खरदी करण्यात येणार आहेत. शहर तसेच पूर्व व पश्चिम उपनगरासाठी ६८ मीटर उंचीच्या तीन टर्न टेबल लॅडर खरेदी करण्यास येणार असून यासाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नैसर्गिक अथवा मानवनिर्मात आपत्तीच्या वेळी जलदगतीने प्रतिसाद देणे तसेच आपत्तीच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणाली उभारण्यात येणार असून यात इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टिम, जीआयएस व जीपीएसवर आधारित स्वयंचलित वाहान ट्रॅकिंग प्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स व्यवस्थापन यंत्रणा -डायल १०१ ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. यासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आणीबाणीच्यावेळी विश्वसनीय दळवणवळण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी साडेआठ कोटी रुपये खर्चून डीजीटल मोबाईल रेडिओ प्रणाली घेतली जाणार आहे. अग्निशमन दलात अतिरिक्त पदे निर्माण करण्याबरोबरच सुमारे सहा हजार नागरी अग्नि स्वयंसेवक प्रशिक्षित केले जाणार आहेत. गेल्या दशकात उभ्या राहिलेल्या उंच इमारती, मॉल्स, मल्टीप्लेक्स तसेच झापडपट्टय़ा लक्षात घेऊन अग्निशमन दल सर्वार्थाने फायरप्रूफ करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai fire brigade to become hi tech
First published on: 05-02-2016 at 02:57 IST