मुंबईत माजी हॉकीपटूची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अपैया चेनंदा (वय ५२) असे या माजी हॉकीपटूचे नाव असून ज्यूनियर हॉकी संघात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. याप्रकरणी पोलिसांनी चेनंदा यांची पत्नी अमिता (४५) विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भांडणानंतर संतापाच्या भरात अमिताने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे.

मालाडमधील उच्चभ्रू परिसरातील इमारतीमध्ये चेनंदा दाम्पत्य राहत होते. अमिता या एका खासगी कंपनीत कामाला असून अपैया हे माजी हॉकीपटू आहेत. अपैया यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून सध्या ते घरीच होते. शनिवारी दुपारी अपैया आणि अमिता हे दोघे घरात होते. तर त्यांचा मुलगा कॉलेजला गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास अपैया आणि अमितामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. संतापाच्या भरात अमिताने अपैया यांच्यावर चाकूने वार केले. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्यांनी चेनंदा यांच्या घराकडे धाव घेतली. चेनंदा हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडले होते. तर अमिताला झटापटीदरम्यान दुखापत झाली होती. अमिताने अपैया यांच्यावर सात वेळा वार केल्याचे समजते. अपैया चेनंदा यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या अमिताला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. डिस्चार्ज मिळाल्यावर अमिताला अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.