मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांच्या मदततीची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूवारी फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा एक भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले होते. अग्निशमन दल आणि महानगरपालिकेच्यावतीने अद्याप शोधमोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.

घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना शेख यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai fort bhanushali building collapse aslam sheikh said 4 lakh rupees families died people jud
First published on: 17-07-2020 at 18:29 IST