मुंबई : मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडय़ाभरात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण तीन टक्के तर मृत्यूचे प्रमाण सुमारे ०.१५ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक नवे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. बुधवारी राज्यात १८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. यातील ६२ टक्के म्हणजेच ११७ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली आहे. २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत मुंबईत ६२८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. या आधीच्या आठवडय़ात म्हणजे १८ ते २४ एप्रिल या काळात मुंबईत ५४२ रुग्णांचे नव्याने निदान झाले होते. रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मृत्यू आणि रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात मात्र फारशी वाढ झालेली नाही. 

मुंबईत १८ ते २४ एप्रिल या काळात केवळ आठ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे, तर शून्य मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या आठवडय़ात रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काही अंशीच वाढ झाली असून हे प्रमाण १९ वर गेले आहे.

  •   मुंबईत सध्या ६४२ रुग्ण उपचाराधीन आहेत. यातील दोन टक्के म्हणजे १५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
  •   मुंबईत सध्या उपलब्ध असलेल्या खाटांपैकी सुमारे ०.०६ टक्केचा खाटा व्यापलेल्या असून उर्वरित खाटा रिक्त आहेत.