आगीपासून वाचण्यासाठी बाथरुमच्या दिशेने पळाले अन् जीवाला मुकले

आग लागल्यानंतर रेस्तराँमध्ये गोंधळाची स्थिती होती

ट्रेड हाऊसमधील टेरेसवर '१ अबव्ह' आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो हे रुफ टॉप रेस्तराँ आणि बार आहेत.

कमला मिल कम्पाऊंडमधील ‘१ अबव्ह’ या रेस्तराँ- बारमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. रेस्तराँमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मार्ग सापडत नसल्याने यातील काही जण बाथरुमच्या दिशेने पळाले. मात्र, बाथमरुममध्ये धुरात गुदमरुन त्या सर्वांचा मृत्यू झाला.

ट्रेड हाऊसमधील टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो हे रुफ टॉप रेस्तराँ आणि बार आहेत. यातील ‘१ अबव्ह’मध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास आग लागली आणि ही आग झपाट्याने मोजोस ब्रिस्ट्रो या पबपर्यंत पोहोचली. बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग पसरत होती.

आग लागल्यानंतर रेस्तराँमध्ये गोंधळाची स्थिती होती. इमर्जन्सी एक्झिट मार्ग सापडत नसल्याने अनेक जण बाथरुमच्या दिशेने पळाले. मात्र, हीच त्यांची घोडचूक ठरली. बाथरुममध्ये धुरात गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेतील १४ जणांचा आगीच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती. तिचा देखील या आगीत मृत्यू झाला.

कमला मिल कंपाऊंडमध्ये मराठी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे तसेच खासगी कंपन्यांचे कार्यालय आहे. कंपाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai kamala mills building fire maximum casualties due to suffocation hiding in bathroom 1 above rooftop bar