शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीमुळे अस्वस्थ झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. मुंबईतल्या वांद्रे येथील तरुणाने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
सोमवारी सकाळी वांद्रे (पूर्व) येथील साई धाम सोसायटीत ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या तरुणाचा भाऊ त्याच खोलीत झोपला असताना मयंक जयेश गाला याने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीबाराच्या आवाजाने भाऊ जागा झाला आणि त्याला हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.




याबद्दल स्थानिक पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली आणि तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसली तरी शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीला कंटाळून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.