मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’ मार्गिकेवरील प्रवासी संख्येने ९० कोटींचा पल्ला गाठला आहे. नऊ वर्षाच्या आतच ‘मेट्रो १’वरून ९० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३३७ किमी लांबीच्या प्रकल्पांतील वाहतूक सेवेत दाखल झालेली ‘मेट्रो १’ पहिली मार्गिका आहे. या मार्गिकेचे संचलन मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) करीत आहे. वर्सोवा – घाटकोपरदरम्यान धावणारी ही मार्गिका ८ जून २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली.
हेही वाचा >>> मुंबई : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढून १७ लाखांची खंडणी उकळली; आरोपी प्रियकराला अटक
या मार्गिकेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला दररोज या मार्गिकेवरून साडेचार लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. दररोज वर्सोवा – घाटकोपरदरम्यान ४०८ फेऱ्या होतात. ‘मेट्रो १’वरील मेट्रो गाड्यांची वारंवारता गर्दीच्या वेळी ३.५ मिनिटे, तर गर्दी नसतान ८ मिनिटे अशी असते. त्यामुळेच प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१४ पासून आजपर्यंत या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ९० कोटींवर पोहचली आहे. लोकलसारखी गर्दी नसल्याने परवडणाऱ्या दरात वातानुकूलित आणि वेगवान प्रवास होत असल्याने ‘मेट्रो १’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मर्यांदीत प्रवासाकरीता विशेष पास यामुळेही प्रवासी ‘मेट्रो १’ला पसंती देत आहेत. त्यामुळे दरवर्षी अंदाजे १० कोटी प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करीत असून ही आमच्याकरीता समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.