चेंबूर ते वडाळा या साडेआठ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होणार याची चाहूल लागली असताना ही मोनोरेल आरंभीच्या काळात सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेतच धावेल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.
पहिल्या टप्प्यात मोनोरेलची सेवा चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या ११.२ किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा अशी सात स्थानके आहेत. चार डब्यांच्या मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६८ इतकी आहे. चेंबूर ते वडाळा हे सरासरी पाऊण तासांचे अंतर मोनोरेलमुळे अवघ्या १९ मिनिटांत कापता येईल.
मोनोरेल रात्री बारापर्यंत धावणार असे नियोजन आहे. पण आरंभीच्या काळात मोनोरेल सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेतच धावेल, असे राज्यमंत्री सामंत यांनी मोनोरेलच्या पाहणीनंतर स्पष्ट केले. तसेच मोनोरेल १२ तास सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. इतक्या विलंबानंतर सुरू होत असलेली मोनोरेल ही अशी अर्धवेळ धावणार असल्याने प्रवाशांचा हिरमोड होणार आहे. सकाळी गार मोनोरेलमधून प्रवास केल्यानंतर सायंकाळी दिसवसभराच्या श्रमाने थकल्यानंतर पुन्हा लोकलचा ‘धक्का’दायक प्रवास किंवा खडबडीत रस्त्यावरील बसमधील अंग मोडणारा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे.
मोनोरेल पूर्णवेळ कधी धावणार याबाबत ‘एमएमआरडीए’कडे विचारणा केली असता, मोनोरेलला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहिले जाईल. त्यानंतरच मागणी आणि प्रतिसाद लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मोनोरेलच्या सेवेची वेळ वाढवली जाईल, असे प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले. पण पूर्णवेळ सुरू करण्यासाठी किती महिने वाट पाहणार या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले नाही.

सरकारने नेमलेल्या निवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सर्व तपासण्याकरून मोनोरेल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला असून एमएमआरडीएने राज्य सरकारकडे अहवाल पाठवला आहे. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण परदेश दौऱ्यावरून परत येताच मोनोरेल सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला आदेश राज्य सरकार काढेल. तो २७ -२८ जानेवारीपर्यंत निघेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत मोनोरेल सुरू होण्याची शक्यता आहे.