तलावांमध्ये उपलब्ध जलसाठा आणि सप्टेंबरमधील कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने व्यावसायिक आस्थापनांमधील पाणी कपातीचे फास आणखी आवळले आहेत. यापुढे जलतरण तलाव आणि वातानुकूलन यंत्रणा यांचा पुरवठा पूर्ण बंद करण्यात येणार असून बांधकाम क्षेत्र, बाटलीबंद पाणी- शीतपेय कारखान्यांमध्ये केवळ कामगारांना पिण्यापुरते पाणी पुरवले जाईल.
महापालिकेच्या तलाव क्षेत्रात आजमितीला साठा आवश्यकतेपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. हा साठा वर्षभर पुरवण्यासाठी पालिकेने आठवडय़ाभरापूर्वी निवासी वापरासाठी वीस टक्के तसेच शंभर मिमीपेक्षा अधिक आकाराच्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा होत असलेल्या व्यावसायिक आस्थापनांसाठी पन्नास टक्के कपात केली होती. आता या निर्देशांमध्ये बदल करीत पालिकेने जलतरण तलाव व वातानुकूलन यंत्रणांना पन्नास टक्केही पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे.  या दोन्ही ठिकाणांचा पुरवठा तातडीने खंडित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरात आजमितीला सुरू असलेल्या हजारावर बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्यांचा व्यास कमी करून अवघा १५ मिमीवर आणला जाईल.  बाटलीबंद पाणी तसेच शीतपेय कारखान्यांनाही हाच न्याय लावला जाईल. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये केलेली पन्नास टक्के कपात सुरूच ठेवली जाणार असली तरी त्यातून रुग्णालयांना वगळण्यात आले आहे.
रुग्णालय तसेच आपत्कालीन सेवांचा पाणीपुरवठा नियमित राहील.  या कपातीमुळे पाण्याची खूप  बचत होणार नसली तरी सद्यपरिस्थितीत र्सवकष जलव्यवस्थापनासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे जलविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेचे सुधारित निर्देश
* तरणतलाव आणि वातानुकूलन यंत्रणेसाठी पाणीपुरवठा पूर्ण बंद.
* बांधकामाच्या ठिकाणच्या जलवाहिनीचा व्यास १५ मिमीपर्यंत कमी करून कामगारांपुरते पिण्याचे पाणी देणार.
* बाटलीबंद पाणी तसेच शीतपेय कारखान्यांमध्येही फक्त पिण्यापुरते पाणी देणार.
पाण्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणांची पाहणी
* रुग्णालय, आपत्कालीन सेवा अपवाद. रुग्णालय, आपत्कालीन वगळता १०० मिमी आणि त्यापेक्षा जास्त आकाराच्या जल जोडण्यांमधील पुरवठय़ात पन्नास टक्के कपात.
* कोणत्याही उद्यानाला नवी जलजोडणी नाही.
* पाणीगळती, पुरवठा यासंबंधी लक्ष देऊन तातडीने निर्णय घेण्याच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना.
* पालिकेचे टँकर्स केवळ निवासी भागातील पाण्याची गरज भागवणार.
मुंबईतील जलसाठा
* सात तलावांमध्ये एकूण जलसाठा – ९ लाख ८५ हजार ६८४ दशलक्ष लिटर
* गेल्या वर्षी या वेळेपर्यंत उपलब्ध जलसाठा – १३ लाख ६७ हजार ४८६ दशलक्ष लिटर आवश्यक पाणीसाठा – १४ लाख दशलक्ष लिटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation takes proactive steps to save water
First published on: 01-09-2015 at 05:01 IST