मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील  फलाटांची अपुरी उंची प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असून या गंभीर समस्येवर रेल्वे मंत्रालयाने ठोस तोडगा काढला आहे. मुंबई विभागातील मध्य व पश्चिम अशा दोन्ही रेल्वेमार्गावरील १३१ फलाटांची उंची येत्या आठ महिन्यांत वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली .
मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील फलाट आणि रेल्वेचा फुटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीबाबत ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. मोनिका मोरे प्रकरणानंतर लोकप्रतिनिधींनीही या समस्येबाबत आवाज उठवला होता, तसेच उच्च न्यायालयाने याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
उपनगरीय रेल्वेच्या २७३ रेल्वे स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या ८३, तर पश्चिम रेल्वेच्या ४८ अशा एकूण १३१ फलाटांची उंची येत्या आठ महिन्यात वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३८ फलाटांची उंची वाढविण्यात येणार असून त्यासाठी १० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ फलाटांची उंची वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. इतर १६ फलाट नवी मुंबईतील असून ते सिडको अंतर्गत येतात.
डागडुजीकरणाचा निर्णय
रेल्वे फलाटांच्या उंचीबरोबरच मध्य रेल्वेच्या ११ फलाटांच्या डागडुजीकरणाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. यात विक्रोळी, विद्याविहार, दादर, सायन, कुर्ला, कांजुरमार्ग, सँडहर्स्ट रोड, रे रोड, मस्जिद बंदर, कॉटन ग्रीन आणि वडाळा रोड या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च येणार असून एका खाजगी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.
स्थानकांच्या डागडुजीकरणामध्ये फलाटाची उंची वाढवणे, जुन्या टय़ूब्ज बदलणे, कोटा स्टोन आणि काळ्या ग्रॅनाईटचे फ्लोअरिंग, रेल्वे स्थानक व त्याच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, तसेच रेल्वेमार्गाची साफसफाई या कामांचा समावेश आहे.