scorecardresearch

मुंबई पोलीस दलातील अंमलदारांनाही आठ तास काम

मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य आणि १६ तास आरामाचे अशी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पुरुष अंमलदारांच्या कामाचा कालावधीही आठ तास केला आहे.

(प्रातिनिधीक फोटो)

मुंबई : मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य आणि १६ तास आरामाचे अशी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पुरुष अंमलदारांच्या कामाचा कालावधीही आठ तास केला आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत अधिकृत पत्रक जारी करून ही माहिती दिली.

पोलिसांकडून आठ तास कर्तव्य कालावधीची मागणी होती. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुंबई पोलिसांच्या कामाचे तास आठ करण्याचा एक प्रस्ताव देवनार पोलीस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तयार केला. त्याला तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हिरवा कंदील दाखवत प्रयोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु केला. पुढे काही पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम सुरू राहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध, अटी, नियम यामुळे ही कार्यपद्धती बंद करण्यात आली होती.

पांडे यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य आणि १६ तास आराम असा निर्णय घेतला. त्यानंतर पुरुष अंमलदारांनीही अशीच मागणी केली. अखेर पांडे यांनी त्यांचा कामाचा कालावधीही आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ५० वर्षांखालील पोलिसांना आठ तास काम आणि १६ तास आराम, तर ५० वर्षांवरील पोलिसांसाठी १२ तास काम आणि २४ तास आराम अशी शिफारस करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी १७ मे पासून होणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police officers work eight hours women police ysh

ताज्या बातम्या