नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी मुंबई पोलीस लवकरच ट्विटर आणि फेसबुकवर येणार आहेत. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी मंगळवारी ही माहिती दिली. कारभारात पारदर्शकता राहण्यासाठी नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले ते दर शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पाहता येणार असल्याचेही ते म्हणाले.
राकेश मारिया यांच्या तडकाफडकी उचलबांगडीनंतर अहमद जावेद यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या आठवडय़ाभरात कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या सगळीकडे फेसबुक आणि ट्विटरचा वापर होत आहे. त्यामुळे मुंबई पोलीसही नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी लवकरच स्वत:चे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस दलात पारदर्शीपणा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी केलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारी पडताळून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. आपण केलेल्या तक्रारींची तपासात काय प्रगती झाली ते नागरिकांना दर शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पाहता येणार आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचार हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग लाचखोर पोलिसांना पकडत आहेत. तरी कुणा पोलिसाविरोधात भ्रष्टाचाराची किंवा पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या तर त्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मागील आयुक्तांनी सुरू ठेवलेल्या सर्व चांगल्या योजना यापुढेही कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.