मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’

शहरात २१७ ठिकाणी धरपकड, ३८ फरार आरोपी अटकेत

(संग्रहित छायाचित्र)

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली.

अमली पदार्थ कायद्यान्वये ८७ जणांवर कारवाई करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३२ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळील शस्त्र जप्त केली. पोलिसांनी शहरात एकाच वेळी १४३ ठिकाणी नाकाबंदी करून १०७९५ वाहनांची तपासणी केली. यातील २२६८ चालकांवर कारवाई करण्यात आली. तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या

३१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली. कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते. शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान पोलिसांनी संवेदनशील आणि मर्मस्थळे असलेल्या ५१२ ठिकाणांची तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. मुंबई सागरी सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ५४ लँडींग पॉँईंटची सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कारवाई अशी..

कारवाईत पोलिसांनी अभिलेखावरील १४५७ आरोपींची तपासणी केली. यात ४६५ आरोपी आढळले. तर अजामीनपात्र वॉरंटमधील १७५ जणांना अटक केली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ९५१ हॉटेल, निवासी हॉटेल व अन्य आस्थापनांची तपासणी केली. शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू आणि जुगाराच्या ५४ ठिकाणांवर छापे घातले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police operation all out abn

ताज्या बातम्या