मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशीच्या निमित्ताने सुरक्षिततेचा उपाय म्हणून  गुरुवारी बेलार्ड पिअर भागातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विभागीय कार्यालयाभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला खरा, पण तेथे मनसे कार्यकर्ते फिरकलेच नाहीत.

राज यांना याआधी अटक झाली तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी शहरात धुडगूस घातला. वांद्रे न्यायालयाजवळ शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमला. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची चौकशी सुरू झाली तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळ गर्दी केली होती. या अनुभवामुळे  पोलिसांनी मंगळवारपासूनच प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. पोलिसांनी आझाद मैदान, मरिन ड्राइव्ह, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यांना हद्दीत जमाव बंदी आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून दिल्या.

स्थानिक पोलीस, सशस्त्र पोलीस दल, दंगल विरोधी पथकाच्या सशस्त्र जवानांचा ईडी कार्यालयाभोवती सकाळी सात वाजल्यापासून बंदोबस्त लावला. कार्यालयाचा आवार निर्मनुष्य ठेवण्यासाठी बऱ्याच लांब अंतरावर अडथळे  लावण्यात आले. प्रत्यक्षात राज कुटुंबासह ईडी कार्यालयात आले तेव्हाही त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा ताफा नव्हता. दिवसभरातही मनसे कार्यकर्ते ईडी कार्यालयाजवळ फिरकले नाहीत.